खासदार नवनीत राणा यांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी देहली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !
अमरावती – येथील खासदार नवनीत राणा यांना एका भ्रमणभाष क्रमांकावरून त्यांच्या वैयक्तिक दूरभाषवर सातत्याने शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून या व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करावी’, अशी मागणी नवनीत राणा यांनी नवी देहली येथील नॉर्थ एव्हेन्यू पोलिसांकडे २५ मे या दिवशी केली आहे. या संदर्भात नवनीत राणा यांच्या स्वीय साहाय्यकांनी देहली पोलिसांकडे लेखी तक्रार प्रविष्ट केली आहे. यापूर्वीही नवनीत राणा यांनी पोलिसांकडे ‘स्वतःच्या जिवाला धोका आहे’, अशी तक्रार केली होती. शिवसेनेच्या काही नेत्यांवर त्यांनी आरोपही केले होते. या तक्रारीत कुठल्याही पक्षाचा उल्लेख नाही.
तक्रारीत म्हटले आहे की, नवनीत राणा यांच्या वैयक्तिक क्रमांकावर २३ मे या दिवशी सायंकाळपासून सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे. आतापर्यंत ११ वेळा संपर्क करण्यात आले आहेत. एक भ्रमणभाषधारक अज्ञात व्यक्ती नवनीत राणा यांना असभ्य भाषेचा वापर करून धमक्या देत आहे. ‘तुम्हाला महाराष्ट्रात पाय ठेवू दिला जाणार नाही. हनुमान चालिसाचे पठण केले, तर जिवे मारून टाकू’, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे नवनीत राणा या मानसिक तणावाखाली असून या अज्ञात व्यक्तीची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.