माफीचा साक्षीदार बनण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा अर्ज !
मुंबई – बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्या अर्जाला सशर्त संमती दिली आहे. ३० मे या दिवशी न्यायालयात सुनावणी होणार आहे. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात स्वतःकडील माहिती देण्याची सिद्धता वाझे यांनी दाखवली आहे, असे वृत्त ‘ए एन.आय.’ वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. न्यायालयाने सचिन वाझे यांची याचिका स्वीकारल्यास त्यांची साक्ष फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवली जाईल. तसेच पुरावे इतर आरोपींविरुद्ध वापरले जाऊ शकतात. यानंतर वाझे यांना खटल्याला सामोरे जावे लागणार नाही. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ४ एप्रिल या दिवशी सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. याच प्रकरणात सचिन वाझे यांनी २५ मे या दिवशी कलम ३०६ अंतर्गत त्यांच्या अधिवक्त्यांच्या माध्यमातून माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. वाझे यांनी अन्वेषण अधिकाऱ्यांना आपण स्वेच्छेने मान्यता देण्यास सिद्ध असल्याचे सांगितले होते. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे.