आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?
(भाग १४)
१. अनेकांचे उपाहारगृहांमध्ये जेवण्याचे प्रमाण वाढणे आणि तेथे उरलेले जेवण घरी आणून शीतकपाटात ठेवले जाणे
सध्या अनेकांचे उपाहारगृहांमध्ये (हॉटेलमध्ये) जाऊन खाण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. लहानशा गावांमधूनही हे प्रमाण वाढत आहे. अनेकदा तेथे गेल्यावर जेवण अधिक झाल्यास घरी घेऊन जाण्यासाठी बांधून घेतात. घरी आल्यावरही भूक नसली, तर ते शीतकपाटात ठेवले जाते. त्यामुळे ते नंतरही खाता येते. सध्या सर्वत्र घरबसल्या उपाहारगृहांतून जेवण मागवण्याची पद्धत चालू झाली आहे. त्या वेळीही जेवण अधिक झाल्यास ते शीतकपाटात ठेवले जाते.
२. उपाहारगृहांमध्ये बनवलेले जेवण रज-तम प्रधान असल्याने ते आरोग्यासाठी हानीकारक ठरणे
बाहेरच्या उपाहारगृहांमध्ये बनवलेले जेवण हे रज-तम प्रधान असते. तेथे काम करणाऱ्यांचा मूळ उद्देश म्हणजे खाद्यान्न विकून धन कमवणे हा असतो. तेथे जेवण बनवण्यासंबंधीच्या आचारधर्माचे पालन केले जात नाही. त्यामुळे असे खाद्यपदार्थ शीतकपाटात ठेवू नयेत. तसेही शीतकपाटात ठेवलेले खाद्यपदार्थ आपल्या शरिराच्या आरोग्यासाठी हानीकारकच असतात. उपाहारगृहांसारख्या रज-तम प्रधान ठिकाणावरून आणलेले खाद्यपदार्थ शीतकपाटात ठेवल्यास तेथील सात्त्विकता नष्ट होते.
३. बाहेरचे खाद्यपदार्थ बनवले जाण्याच्या विविध अयोग्य पद्धती !
बाहेर खाद्यपदार्थ कशा पद्धतीने बनवले जातात, हे आपण सामाजिक संकेतस्थळांवर पहातो. कुणी ते पदार्थ उष्टे करतात, तर कुणी त्यात थुंकतात. काही ठिकाणी ते पदार्थ उंदीर खात असतात, तर काही ठिकाणी ते पदार्थ अत्यंत अस्वच्छ वातावरणात बनवले जातात.
४. आयुर्वेदानुसार अन्नग्रहण कधी करावे ?
आयुर्वेदानुसार स्वयंपाक केल्यानंतर तो ४५ मिनिटांच्या आत ग्रहण करायला हवा, अन्यथा त्यातील पोषक तत्त्वे न्यून होतात. विशाल मंदिरे किंवा शतकानुशतके उन्हापावसात उभा असूनही कधीही न गंजणाऱ्या अशोकस्तंभाची निर्मिती करणारे किंवा पृथ्वीपासून सूर्याचे अंतर सांगणारे आपले पूर्वज एका शीतकपाटाची निर्मिती करू शकत नव्हते का ? खरे पहाता आपल्या ऋषिमुनींनी जे सांगितले किंवा बनवले आहे, ते आपल्यासाठी कल्याणकारक ठरणारेच आहे. त्यामुळे शिळे किंवा पुष्कळ वेळापर्यंत शिजवून ठेवलेले खाद्यपदार्थ ग्रहण करू नयेत.
५. पाश्चात्त्यांप्रमाणे शीतकपाटातील बर्फात अन्नपदार्थ ठेवू नका !
विशेषतः आजकाल अनेक दिवस शीतकपाटातील बर्फात अन्नपदार्थ ठेवण्याची (‘फ्रोझन फूड’ची) पद्धत पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणून भारतातही चालू झाली आहे. अशा पदार्थांना तर विषच समजावे. ते मुळीच ग्रहण करू नये.
६. शीतकपाटात काय ठेवावे ?
शीतकपाटात दूध, दही, फळे, कच्च्या भाज्या किंवा मिठाई ठेवू शकतो. शीतकपाट हेसुद्धा एक प्रकारे साठवणुकीचे मोठे पात्रच आहे.
७. उपाहारगृहांमध्ये अपेक्षित स्वच्छता नसल्याने आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने तेथे जेवणे टाळावे !
मागील वर्षी मी ऑस्ट्रिया येथे गेले होते. तेथे एका साधकाच्या घरी निवासाला होते. त्यांचे स्वतःचे उपाहारगृह (हॉटेल) आहे. एकदा त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही कधीही आमच्या उपाहारगृहात जेवत नाही, तसेच अन्य मोठ्या उपाहारगृहांतही खाण्यासाठी जात नाही. आम्ही तर व्यवसाय म्हणून जेवण बनवतो. आमचे स्वयंपाकी (आचारी) जेवण बनवतात; पण त्या वेळी तेथे म्हणावी एवढी स्वच्छता ठेवत नाहीत. पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही उत्कृष्ट प्रतीचे नसते.’’ त्यामुळे एकतर अगदी आपत्कालीन स्थितीत उपाहारगृहात जाऊन जेवावे. त्यातही ते जेवण गरम असतांनाच ग्रहण करावे. तुमच्या समोर बनवलेले पदार्थच ग्रहण करावेत. तेथे शेष राहिलेले पदार्थ नंतर खाण्यासाठी कधीही घरी आणू नयेत.
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (८.२.२०२२)