साधकांना सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘संत’ असा नसून ‘अवतार’ असा असण्यामागील कार्यकारणभाव
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
काही संत आणि ‘नाडीपट्टी’च्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे महर्षि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘अवतार’ असा करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विविध वैशिष्ट्यांमुळे ते त्यांचा उल्लेख ‘अवतार’ म्हणून करतात. याच प्रकारे साधकांना सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘संत’ असा नसून ‘अवतार’ असा असतो, त्यामागील कारण या लेखात देत आहे.
१. सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘अवतार’ असा असण्यामागील कारणे आणि त्याचे प्रमाण (टक्के)
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गाठलेल्या समष्टी साधनेच्या उच्चतम स्तराची समष्टीला जाणीव होण्यासाठी ईश्वरी ज्ञानात त्यांचा उल्लेख ‘अवतार’ असा असणे
‘अध्यात्मात ‘संत’ आणि ‘सद्गुरु’ या व्यष्टी साधनेच्या पदव्या आहेत. गुरुकृपेने व्यष्टी साधना करून अधिकाधिक ८० टक्के आध्यात्मिक पातळी, म्हणजे सद्गुरुपद प्राप्त करता येते. त्याच्याहून पुढील आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी जिवाला समष्टी साधना करावी लागते. ‘परात्पर गुरु’ ही समष्टी पदवी आहे. असे असले, तरी परात्पर गुरु पदावरील जीव ‘इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती’ यांपैकी एकाच स्तरावर कार्य करतात. देहत्यागानंतर इच्छाशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे जीव ‘मनु’ इत्यादी पद प्राप्त करतात, क्रियाशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे जीव ‘ऋषि किंवा मुनि’ होतात, तर ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे जीव ‘महर्षि’ होतात. (ज्या प्रकारे सात्त्विक पितर मृत्यूनंतर आदित्य, वसु, रूद्र होतात, पुण्यवान जीव मृत्यूनंतर इंद्र होतात, त्या प्रकारे परात्पर गुरु पातळीचे जीव मनु, ऋषि, मुनि आणि महर्षि होऊन स्वत:ची समष्टी साधना करून ईश्वराशी एकरूप होतात.)
याउलट परात्पर गुरु डॉ. आठवले एकमात्र असे परात्पर गुरु आहेत, जे इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिन्ही स्तरांवर कार्य करत आहेत. सर्वसाधारणत: अवतारच इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिन्ही स्तरांवर कार्य करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समष्टी साधनेमुळे अध्यात्मातील उच्चतम स्तर गाठलेला आहे. त्यांचे हे आगळे वेगळे वैशिष्ट्य कळण्यासाठी ईश्वरी ज्ञानात त्यांचा उल्लेख ‘अवतार’ असा केला जातो.
व्यष्टी साधना करणारे संत स्वत:ची प्रकृती जपतात, यामुळे त्यांना निर्गुण तत्त्वधारणा (निर्गुण तत्त्वाच्या बळावर कार्य करणे) ग्रहण करता येत नाही. याउलट समष्टी साधनेमुळे प्रकृतीचा लय झाल्याने निर्गुण तत्त्वधारणेच्या बळावर कार्य करता येते. निर्गुण तत्त्वधारणेच्या बळामुळे इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिन्ही स्तरांवर कार्य करणे शक्य होते. समष्टी साधना करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वत:च्या प्रकृतीचा लय केला आहे. यामुळे अंदाजे वर्ष २०१६ पासून ते निर्गुण तत्त्वधारणा ग्रहण करत आहेत. त्यामुळे त्यांना इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिन्ही स्तरांवर कार्य करणे शक्य होत आहे. या प्रकारे समष्टी साधनेद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गाठलेल्या उच्चतम स्तराचा बोध समष्टीला व्हावा; म्हणून ईश्वरी ज्ञानात त्यांचा उल्लेख ‘अवतार’ असा केला जातो.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून ‘ज्ञान, भक्ती आणि कर्म’ यांच्या त्रिवेणी संगमाद्वारे करवून घेत असलेल्या साधनेचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी त्यांचा उल्लेख ‘अवतार’ म्हणून केला जाणे
सर्वसाधारणत: अन्य संत ज्ञान, भक्ती आणि कर्म यांपैकी एकाच मार्गातून साधना करण्याचे ज्ञान त्यांच्या शिष्यांना देतात. याउलट परात्पर गुरु डॉ. आठवले ‘ज्ञान, भक्ती आणि कर्म’ यांच्या त्रिवेणी संगमाद्वारे साधकांकडून व्यष्टी आणि समष्टी साधना करवून घेत आहेत. यामुळे साधकांना एकाच जन्मात ६१ टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी, संत किंवा सद्गुरुपद गाठणे शक्य होत आहे. आतापर्यंतच्या इतिहासात केवळ अवतारांनीच ‘ज्ञान, भक्ती आणि कर्म’ यांच्या त्रिवेणी संगमाद्वारे समष्टीला मार्गदर्शन केले आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले करत असलेले साधनेचे मार्गदर्शन प्रकृतीनुसार आणि काळानुसार सतत पालटणारे असते. या मार्गदर्शनाला स्वीकारून त्यानुसार आचरण करण्यात साधकांचे मन आणि बुद्धी यांचा संघर्ष होतो. या संघर्षातून साधक बाहेर पडावे, तसेच ‘झालेले पालट हे अवतारी कार्य आणि लीला यांतील एक भाग आहे’, याची जाणीव साधकांच्या सुप्त मनाला व्हावी; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून करवून घेत असलेल्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व स्पष्ट होण्यासाठी ईश्वरी ज्ञानात त्यांचा उल्लेख ‘अवतार’ म्हणून केला जातो. महाभारताचे युद्ध होतांना अर्जुनालाही श्रीकृष्ण सांगत असलेले तत्त्व स्वीकार होत नव्हते, त्या वेळी भगवान श्रीकृष्णाने स्वत:चे विश्वरूपदर्शन देऊन अर्जुनाच्या शंकेचे निरसन केले होते. त्याच प्रकारे ईश्वरी ज्ञानातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व स्पष्ट केले जाते, ज्यामुळे साधकांना मन आणि बुद्धी यांच्या संघर्षावर मात करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करणे शक्य व्हावे.
४. कलियुगातील समष्टीच्या मन आणि बुद्धी यांवरील मायेचे आवरण जाऊन त्यांची भावस्थिती जागृत रहाण्यासाठी ईश्वरी ज्ञानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘अवतार’ असा केला जाणे
वर्तमान कलियुगातील अधिकांश जिवांचे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक (काळ्या) शक्तीचे मोठे आवरण असते. साधना करणाऱ्या जिवांचे मन आणि बुद्धी यांवरही त्रासदायक शक्तीचे आवरण काही प्रमाणात असते. या त्रासदायक शक्तीच्या आवरणामुळे जिवाचे मन आणि बुद्धी कार्यरत रहात असल्याने त्यांना सतत भावस्थितीत राहून चैतन्य ग्रहण करणे किंवा गुरु करत असलेले मार्गदर्शन समजून घेणे शक्य होत नाही. यामुळे अनेक वेळा ईश्वरी ज्ञान सोप्या भाषेत असूनही त्यात मांडलेले सूत्र साधकांना सुस्पष्ट होत नाही. साधकांची भावाची स्थिती असेल, तर भावामुळे त्यांना ईश्वरी चैतन्य ग्रहण करून ज्ञान समजणे सोपे होते. यामुळे साधना करणाऱ्या समष्टीच्या मन आणि बुद्धी यांवरील मायेचे आवरण जाऊन त्यांची भावस्थिती जागृत होण्यासाठी अनेक वेळा ईश्वरी ज्ञानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘अवतार’ असा केला जातो. समष्टीचा भाव जेवढा अधिक असतो, त्या प्रमाणात त्यांना त्या कार्यासाठी ईश्वरी साहाय्य मिळते.’
५. ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाच्या भावस्थितीमुळे त्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘अवतार’ म्हणून करावासा वाटणे
‘अनेक वेळा देवता, प्रारब्ध, संगीत अशा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी संबंधित नसलेल्या विषयांशी संबंधित ईश्वरी ज्ञान मिळवतांना माझी भावजागृती होते. कधी-कधी ज्ञानाची सेवा करतांना विष्णु, श्रीराम आणि श्रीकृष्ण या रूपांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होते. काही वेळा दर्शन न होता भाव जागृत होतो. त्या वेळी ‘अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण करून विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ज्ञान मिळून त्याचे टंकलेखन करणे, ही सेवा करणे शक्य होत आहे’, असे जाणवून त्या लेखात त्यांच्याप्रती कृतज्ञता लिहिली जाते. अशा भावपूर्ण कृतज्ञतेमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘अवतार’ म्हणून केला जातो.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२२, सायं ६.१७)
|