नाशिक येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींची आयात आणि विक्री यांवर बंदी !

गोदावरीसह नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी आयुक्तांचा निर्णय !

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’

नाशिक – येथील गोदावरीसह नद्यांचे वाढते प्रदूषण लक्षात घेता महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी केंद्रशासन, तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शहरात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ (‘पीओपी’) पासून निर्मिती होणार्‍या सर्व प्रकारच्या मूर्तींची निर्मिती, आयात, साठा आणि विक्री यांवर बंदी घातली आहे, तसेच ‘पीओपी’च्या मूर्ती नदीपात्रात वा नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात विसर्जित करतांना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

१. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ‘पीओपी’पासून निर्मिती होणार्‍या मूर्तींच्या दुष्परिणामांविषयी चर्चा होत आहे. सहजासहजी विघटन न होणार्‍या ‘पीओपी’च्या मूर्तींवर केंद्र आणि राज्य शासनाने बंदी घातली आहे.

२. ही गोष्ट लक्षात घेता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘पीओपी’पासून मूर्ती निर्मिती, आयात, साठा आणि विक्री यांवर बंदीचे आदेश महापालिकेला दिले आहेत.

३. यापूर्वीच ही बंदी अंमलात आणण्यासाठी प्रयत्न झाले होते; मात्र मूर्तीकार, तसेच आयात, साठा आणि विक्री करणार्‍या व्यापार्‍यांनी जुन्या साठ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नियमांची सक्ती लगेचच करू नये’, अशी मागणी केली होती.

४. या निर्णयाला १ जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता गणेशोत्सव समीप आल्यावर पुन्हा एकदा मूर्तीकार, तसेच अन्य घटक यांकडून मुदतवाढीची मागणी होऊ शकते.

५. हे लक्षात घेता आयुक्त पवार यांनी ऐनवेळी बंदी लागू केल्यास भावनेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत ३ मासांपूर्वीच ‘पीओपी’ मूर्तींची निर्मिती, आयात, साठा आणि विक्री करण्यास निर्बंध लागू केले.

६. नदीपात्रात आणि नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांच्या ठिकाणी ‘पीओपी’च्या मूर्ती विसर्जित करतांना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

संपादकीय भूमिका

सर्वच ठिकाणच्या प्रशासनाने असा निर्णय घेतल्यास ते धर्मशास्त्रसुसंगत ठरेल !