टेक्सास (अमेरिका) येथे तरुणाचा शाळेत गोळीबार : २ शिक्षक आणि १९ विद्यार्थी ठार
टेक्सास (अमेरिका) – येथील उवाल्डे शहरातील प्राथमिक शाळेत १८ वर्षीय तरुणाने केलेल्या गोळीबारात २१ जणांचा मृत्यू झाला. यात २ शिक्षक आणि १९ विद्यार्थी यांचा समावेश आहे. या वेळी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाला ठार केले. तो येथील शाळेचा विद्यार्थी होता. हत्याकांडाच्या या घटनेमुळे अमेरिकेत ४ दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे. याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली. बंदुका बाळगण्यावर बंदी आणण्याविषयी त्यांनी सुतोवाच केले आहे. ‘आपण या बंदुकींचा व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात केव्हा उभे रहाणार आहोत ?’, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
शाळेत जाण्याआधी आक्रमणकर्त्या तरुणाने स्वतःच्या आजीला गोळी घातली होती. यानंतर त्यांना सॅन एंटोनियो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आजीला गोळी घातल्यानंतर हा तरुण शाळेत पोचला आणि त्याने विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. शाळेत घुसण्याआधी त्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते. त्याने शाळेतील वेगवेगळ्या वर्गात जाऊन गोळीबार केला.
संपादकीय भूमिकाअमेरिकेत खाद्यपदार्थांप्रमाणे बंदुका विकल्या जातात. लोकांकडे एकहून अधिक बंदुका असतात. अशा बंदुका संस्कारहीन मुले आणि तरुण यांच्या हातात सहज सापडतात अन् अशा घटना घडतात ! |