शिस्तच हवी !
जळगाव येथील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या जवळ रेल्वे रूळ ओलांडतांना त्या ठिकाणी असलेला अंधार आणि कानात असलेल्या ‘हेडफोन’मुळे सौ. स्नेहल उजेनकर यांना समोरून येणाऱ्या रेल्वेचा आवाज आला नाही. त्यामुळे वेगात असणाऱ्या रेल्वेने त्यांना जोरात धडक दिल्यामुळे त्या जागीच ठार झाल्या. सौ. स्नेहल उजेनकर यांचा काही मासांपूर्वीच विवाह झाला होता. या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका चुकीमुळे स्वतःचा जीव तर गमवावा लागला आणि इतरांनाही दुःखाच्या खाईत टाकले.
रेल्वे प्रशासनाने विविध ठिकाणी ‘फूट ओव्हर ब्रिज’ (पायी चालण्यासाठीचा पूल) बांधलेले आहेत. तरीही प्रवासी याचा वापर न करता ‘वेळ वाचावा’ या उद्देशाने थेट रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. सौ. स्नेहल यांनीही असाच प्रयत्न केला. यामध्ये वेळ तर वाचलाच नाही; परंतु भगवंताने दिलेला अमूल्य असा मनुष्यजन्म क्षुल्लक कारणासाठी गमवावा लागला. अशा प्रकारे जिवाची पर्वा न करता कृती केल्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागल्याची उदाहरणे आपण प्रतिदिन पहातो. ‘घाई आहे’ म्हणून चालत्या रेल्वेतून उतरणे किंवा चढणे अशा प्रकारे कृती करून काहींनी स्वतःचा जीव गमवला आहे, तर काहींनी अपंगत्वही पत्करले आहे. असे असतांना स्वतः नियम न पाळणे आणि इतरांच्या उदाहरणातूनही न शिकणे अशांची संख्या अधिक आहे.
ही सर्व उदाहरणे पाहिल्यास भारतातील जनतेमध्ये स्वयंशिस्त तर नाहीच; परंतु नियम न पाळण्याची वृत्तीही पुष्कळ अधिक प्रमाणात आहे. याचा परिणाम प्रशासनही जनतेला शिस्त लावू शकत नाही आणि जनताही स्वयंस्फूर्तीने योग्य कृती करतांना दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे जनतेवर ना धर्माचा अंकुश आहे ना प्रशासनाचा ? त्यामुळे जनतेला कशाचीच भीती नाही; मात्र हेच लोक विदेशात गेल्यावर तेथील सर्व नियम पाळतात. कचऱ्याचेही ओला कचरा आणि सुका कचरा असे दोन डबे असतील, तर स्वतःकडील कचरा त्या त्या डब्यात टाकतील; परंतु भारतात मात्र सरसकट सर्व कचरा रस्त्यावरच फेकतील. विदेशामध्ये धर्माचा अंकुश नसला, तरी प्रशासनाने सर्व नियम कडक केल्यामुळे प्रत्येक जण नियम पाळण्याकडे लक्ष देतो. भारतातील लोकसंख्या पहाता जनतेला स्वयंशिस्त लावायची असेल, तर धर्मशिक्षण दिल्यास प्रत्येकाला स्वतःचे कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडण्याचे महत्त्व लक्षात येईल. यातून जनतेची आध्यात्मिक उन्नतीही होईल आणि तिला शिस्तही लागेल. अशा प्रकारचे वातावरण हिंदु राष्ट्रात असेल.
– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, सनातन आश्रम, देवद.