आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?
(भाग १३)
पाहुण्यांनी खाल्लेल्या पदार्थांतील काही भाग उरल्यावर त्याचे काय करावे ?
१. पाहुण्यांनी खाल्लेल्या पदार्थांतील काही पदार्थ उरल्यास ते उष्टे होणे आणि नकारात्मक उर्जेने प्रभावित झाल्याने ते आध्यात्मिकदृष्ट्याही दूषित होणे : अनेक घरांमध्ये जेव्हा अतिथी (पाहुणे) येतात, तेव्हा त्यांना चहा आणि खारे पदार्थ (चिवडा, शेव, बिस्किटे इत्यादी) दिले जातात. काही वेळा ते त्यातील थोडेसेच खाऊन बाकीचे ठेवून देतात. घरातील स्त्रिया ते पुन्हा अन्नपूर्णाकक्षातील डब्यांमध्ये मिसळतात. याविषयी विचारल्यावर त्या म्हणतात, ‘ते कोरडेच तर होते. उष्टे झाले नाही.’ तसे पहाता ते उष्टे झालेलेच असते; परंतु जर तुम्ही त्याला उष्टेच मानत नसाल, तर ज्या कुणी त्या आहाराला स्पर्श केला आहे, त्याची स्पंदने त्यात येतातच. जर संबंधित व्यक्तीला अनिष्ट शक्तींचा त्रास असेल, तर ते पदार्थसुद्धा नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होतात. तुम्ही ज्या डब्यात तो पदार्थ ठेवला आहे, तो आध्यात्मिकदृष्ट्या दूषित होतो. त्यामुळे अशी चूक करू नये.
२. उरलेले पदार्थ अन्नपूर्णाकक्षातील डब्यांमध्ये न मिसळता वेगळ्या भांड्यात काढून ठेवावेत ! : पाहुण्यांनी खाऊन उरलेला पदार्थ एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवावा. ‘थेंबे थेंबे तळे साचे’, ही म्हण आपण ऐकलीच असेल. अशा लहान लहान गोष्टींमुळेच आपल्या अन्नपूर्णाकक्षात ठेवलेल्या खाद्यपदार्थांच्या स्पंदनांवर नकारात्मक प्रभाव पडतो. हे टाळण्यासाठी योग्य कृती करावी.
३. पाहुण्यांना दिलेल्या खाद्यपदार्थातील काही भाग उरल्यास काय करावे ? : पाहुण्यांना दिलेला अल्पाहार त्यांनी अर्धा ग्रहण केला आणि अर्धा तसाच ठेवला असेल, तर तो अन्य पशूंना (गाय सोडून) किंवा भिकाऱ्याला द्यावा. जर तुम्हाला वेगळे वाटत नसेल, तर घरातील व्यक्ती तो खाऊ शकतात; पण उरलेला खाद्यपदार्थ अन्नपूर्णाकक्षात ठेवू नये. जर पाहुण्यांना अनिष्ट शक्तींचा त्रास असल्याचे ठाऊक असेल किंवा ते व्यसनाधीन असतील, तर त्यांना दिलेल्या खाद्यपदार्थापैकी काही राहिले असल्यास ते काहीच खाऊ नये. संतांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचेही उरलेले पदार्थ कुणीही खाऊ नयेत. उरलेले पदार्थ अन्य पाहुण्यांनाही देऊ नये; कारण भारतीय संस्कृतीत अतिथींना देव मानले जाते. आपणही कुणाच्या घरी पदार्थ शेष ठेवू नयेत; कारण जसे ‘उरलेल्या पदार्थाचे काय करावे ?’, हा प्रश्न तुम्हाला पडतो, तसा प्रश्न अन्यांनाही पडू शकतो.
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (८.२.२०२२)