देशातील प्रत्येक मशिदीचे सर्वेक्षण करावे ! – भाजपचे आमदार

मंगळुरू येथील जुम्मा मशिदीत मंदिराचे अवशेष सापडल्याचे प्रकरण

मलाली जुम्मा मशिदीच्या नूतनीकरणाच्या वेळी सापडलेले हिंदू मंदिराचे अवशेष

मंगळुरू (कर्नाटक) – देशातील प्रत्येक मशिदीचे सर्वेक्षण झाले पाहिजे; कारण बहुतांश मशिदी हिंदूंच्या मंदिरांवर बांधल्या गेल्या आहेत. प्रत्येक वेळेस धार्मिक स्थळ कायदा १९९१ चा आधार घेणे योग्य नाही, असे विधान भाजपचे आमदार भारत शेट्टी यांनी केले.

येथील मलाली जुम्मा मशिदीच्या परिसरात पोलिसांनी २६ मेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. या मशिदीच्या नूतनीकरणाच्या वेळी तेथे २१ एप्रिल या दिवशी हिंदु मंदिराप्रमाणे वास्तूचे अवशेष सापडले होते.

त्यानंतर हिंदूंनी येथे पूजा करण्याची अनुमती देण्याची आणि या मशिदीला संरक्षित करण्याची मागणी केली होती. दुसरीकडे स्थानिक न्यायालयाने मशिदीच्या नूतनीकरणाचे काम थांबवले आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार शेट्टी बोलत होते. भाजपने या मशिदीचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर २५ मे या दिवशी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी येथील श्री रामंजनेय भजन मंदिरात पूजाअर्चना केली. याविषयी राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले की, जिल्हा प्रशासन स्थितीवर लक्ष ठेवून आहे.

काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी म्हटले की, भाजप कर्नाटकचे नाव खराब करत आहे. मंगळुरू आर्थिक गुंतवणुकीसाठी चांगले स्थान असतांना अशा प्रकारच्या वादामुळे उद्योगांवर परिणाम होत आहे.

संपादकीय भूमिका

भाजपच्या आमदारांनी अशी मागणी करण्यासह केंद्रात त्यांच्या पक्षाची सत्ता असल्यामुळे ‘भारतातील प्रत्येक मशिदीच्या सर्वेक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकारने द्यावा’, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !