परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्या आणि नामस्मरण करत जीवनयात्रा संपवणार्या कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. श्रीमती नलंदा खाडयेआजी (वय ८१ वर्षे) !
कै. श्रीमती नलंदा खाडयेआजी वर्ष १९९५ पासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत होत्या. त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा होती. त्यांनी त्यांच्या सर्व कुटुंबियांनाही सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना ३ मुली आणि २ मुलगे असून त्यांची धाकटी कन्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि मोठा मुलगा श्री. मनोजकुमार खाडये हे पूर्णवेळ साधना करत आहेत. खाडयेआजींनी त्यांच्या सर्व नातवंडांवरही साधनेचे संस्कार केले. ६.६.२०२१ या दिवशी त्यांना देवाच्या कृपेने नामस्मरण करतांना, शांतपणे आणि सहज मृत्यू आला. २६.५.२०२२ या दिवशी त्यांचे वर्षश्राद्ध आहे. त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. मंजुषा मनोजकुमार खाडये (कै. खाडयेआजींची मोठी सून), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
१ अ. बालपणी झालेले राष्ट्रभक्तीचे संस्कार : ‘मी माझ्या सासूबाईंना ‘आई’ म्हणत असे. आईंच्या जीवनपटावरून दृष्टी फिरवतांना ‘त्यांच्या लहानपणी त्यांच्यावर झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रप्रेमाचे संस्कार आणि धर्मप्रेम त्यांच्या मनात रुजले होते’, असे दिसून येत होते. त्यांच्या लहानपणी पू. गोळवलकर गुरुजी त्यांच्या घरी आले होते. तेव्हा त्यांना पू. गोळवलकर गुरुजींची सेवा करता आली होती. त्यासाठी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
१ आ. वैवाहिक जीवन
१. आई त्यांच्या विवाहापूर्वी मुंबईला रहात होत्या. विवाहानंतर त्या आरे (कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) या खेडेगावात रहायला आल्या.
२. माझ्या सासऱ्यांचे किराणामालाचे दुकान होते. आजूबाजूच्या ३ – ४ गावांत मिळून हे एकच किराणामालाचे दुकान असल्याने आमच्या दुकानात सतत कुणी ना कुणी यायचे. माझे सासरे (भाई) अनेक जणांना ‘जेवून जा’, असे सांगायचे. तेव्हा आई घरी चुलीवर स्वयंपाक बनवायच्या आणि घरी केलेला सर्व स्वयंपाक त्यांना वाढायच्या.
३. आमचे आरे गावातील घर नदीकाठी होते. काही वेळा नदीला पूर येऊन नदीचे पाणी कधी आमच्या घरापर्यंत, तर कधी घरातही यायचे. आमचे किराणामालाचे दुकान होते आणि घरात लहान मुले अन् गाई-वासरे होती. त्या वेळी हे सर्व सांभाळतांना आईंना पुष्कळ कसरत करावी लागायची.
१ इ. साधना आणि सेवा
१ इ १. वर्ष १९९५ मध्ये आईंचा सनातन संस्थेशी संपर्क होणे, त्यानंतर त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा निर्माण होऊन त्यांनी विविध सेवा करणे : आईंची ‘श्रीराम, रामरक्षा आणि ग्रामदैवत श्री देव आरेश्वर’ यांच्यावर पुष्कळ श्रद्धा होती. वर्ष १९९५ मध्ये त्यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यापासून त्यांची प.पू. गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) श्रद्धा निर्माण झाली. पतीनिधनानंतर त्या सनातन संस्थेच्या कुडाळ सेवाकेंद्राजवळ रहायला आल्या आणि त्यांनी सेवाकेंद्रात जाऊन सेवेला आरंभ केला. माझ्या लग्नानंतर त्यांनी माझ्या समवेत प्रसार सेवेला आरंभ केला. वर्ष २०१५ पर्यंत त्या गुरुपौर्णिमेचा प्रसार, सनातन पंचांग वितरण करणे इत्यादी सेवा करत होत्या.
१ इ २. दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित वाचून त्यांतील महत्त्वाची सूत्रे कुटुंबियांना सांगणे : त्या दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमितपणे वाचायच्या आणि त्यातील अन्यायकारक घटनांच्या विरोधात चीड व्यक्त करायच्या. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लहान मुलांविषयी सूत्रे आली असतील, तर त्या वैदेहीला खाडये (मुलीला, वय १५ वर्षे) आठवणीने सांगायच्या आणि साधकांसाठी आलेल्या सूचना मला सांगायचा.
१ इ ३. उत्तम स्मरणशक्ती आणि उत्साही : आईंचे ८१ वर्षे वय असले, तरी त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती. त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल, असा होता. आम्हाला कधी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली कुठलीही वार्ता किंवा सूचना वाचायची असेल किंवा काही संदर्भ हवा असेल, तर ‘त्याविषयी कुठल्या दिवसाच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये माहिती मिळेल ?’, ते आम्हाला अचूक सांगायच्या.
१ इ ४. इतरांचे कौतुक करणे : आईंना रामनाथी आश्रमातील सौ. शालिनी मराठेकाकू (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेले लेख आणि कविता पुष्कळ आवडायच्या. ‘त्या फार सुंदर लिहितात. त्यांना खाऊ पाठव’, असे त्या मला सांगायच्या.
१ इ ५. अतिशय स्थिर असणे : कितीही कठीण प्रसंग आला, तरी त्या स्थिर असायच्या आणि काही वेळा भावपूर्ण भजने म्हणत भगवंताला आळवायच्या. मी कधी रडत असेन, तर त्या मला सांगायच्या, ‘‘रडून काही होत नाही. आपण लढले पाहिजे. आपण शांत राहून प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे. प.पू. गुरुदेव आहेत.’’
१ इ ६. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याकडे ‘मुलगी’ म्हणून न पहाता ‘सद्गुरु’ या भावाने पहाणाऱ्या श्रीमती नलंदा खाडयेआजी ! : त्यांची सद्गुरु स्वातीताईंवर अपार श्रद्धा होती. आई पडल्यानंतर त्यांचा पाय दुखत असतांना आम्ही सद्गुरु स्वातीताईंना भ्रमणभाष केला होता. तेव्हा आई त्यांना म्हणाल्या, ‘‘आपली आमच्यावर कृपा असू दे.’’ त्या हे वाक्य ५ मिनिटांच्या बोलण्यात २ – ३ वेळा म्हणाल्या. त्यांचे सद्गुरु स्वातीताईंशी झालेले हे शेवटचेच बोलणे ! तेव्हा ‘आई सद्गुरु स्वातीताईंकडे ‘धाकटी मुलगी’ म्हणून न पहाता ‘सद्गुरु’ या भावानेच पहात होत्या’, हे माझ्या लक्षात आले.
१ इ ७. मुला-नातवंडांची आठवण न काढता केवळ ईश्वर आणि सद्गुरु यांचे स्मरण करून साधनेत रहाणे : २.६.२०२१ या दिवशी संध्याकाळी आई अंगणात अडखळून पडल्या आणि रविवारी हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला. आईंचे त्यांची मुले आणि नातवंडे यांच्यावर फार प्रेम होते; पण त्या पडल्यापासून रविवारी सकाळपर्यंत त्यांनी मुले-नातवंडे यांची आठवण काढली नाही. त्यांना आठवण होती, ती केवळ श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरु स्वातीताई आणि सद्गुरु सत्यवानदादा यांची ! पायाच्या दुखण्यावर मात करण्यासाठी त्यांनी केवळ साधनेकडेच लक्ष दिले. शेवटच्या २ दिवसांत त्यांना कुठल्याही गोष्टीविषयी आसक्ती नव्हती किंवा मनात साधा विचारही आला नव्हता. त्यामुळे त्यांना देह सोडणे सोपे झाले. आपल्या भक्तांना भवसागरातून तारून नेण्यासाठी देवाची केवढी ही लीला !
‘गुरुदेव, आईंची शिकवण आयुष्यभर लक्षात राहून वेळोवेळी माझ्याकडून तशा कृती करवून घ्याव्यात’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
२. श्री. विजय मिसाळ (थोरले जावई) ओरोस, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
२ अ. प्रेमळ : मी त्यांचा जावई असलो, तरी त्यांनी माझ्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केले. त्या अत्यंत प्रेमळ होत्या. त्यांचा सहवास नेहमीच सर्वांना हवाहवासा वाटत असे.’
३. सौ. सेजल संजय खाडये (कै. खाडयेआजींची धाकटी सून), पिंपरी, पुणे.
३ अ. सुनांना मुलीप्रमाणे वागणूक देणे : ‘सासूबाईंची (आईंची) मूर्ती लहान होती; पण कीर्ती महान होती. त्या नेहमी हसतमुख असायच्या. त्या चांगले संस्कार करणाऱ्या उत्तम ‘आई’ होत्या. त्यांचे वागणे आणि बोलणे शिस्तप्रिय अन् आदरयुक्त असायचे. त्यांनी आम्हा दोघी सुनांना मुलींसारखीच वागणूक दिली.
३ आ. सासूबाईंना अन्न वाया घालवलेले आवडत नसणे : आई कुठलीही गोष्ट टाकून द्यायच्या नाहीत. त्या टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवायच्या. त्या शेष राहिलेल्या अन्नापासून दुसरा उत्तम पदार्थ बनवायच्या. ‘ताटातील कुठलाही पदार्थ टाकायचा नाही.’, ही त्यांची मोठी शिकवण होती.
३ इ. खाडये कुटुंबियांचा आधारस्तंभ असणे : आई खाडये कुटुंबियांचा आधारस्तंभ होत्या. त्या सर्वांचेच हसतमुखाने स्वागत करून त्यांची प्रेमाने विचारपूस करायच्या. ‘आई’ या शब्दांतच सर्वकाही दडले आहे. एका सद्गुरूंना घडवणारी आई साधीसुधी नव्हती, तर ती सर्वांची माऊली होती.’
४. खाडयेआजींनी स्वतःच्या आचरणातून नातवंडांवर केलेले साधनेचे संस्कार !
४ अ. कु. वैष्णवी विजय मिसाळ (कै. खाडयेआजींच्या मोठ्या मुलीची मोठी मुलगी), ओरोस, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
‘आजी-आजोबा ‘वात्सल्याचा झरा’ असतात’, असे आपण सर्वच जण अनुभवतो. कै. श्रीमती नलंदा खाडयेआजी, म्हणजे ‘वात्सल्य, प्रेम आणि ममता’ यांचे प्रतीक होती. ती गुणांची खाण होती. आजीच्या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वातून आम्हा सर्वांनाच अनेक गुण शिकता आले. तिने आमच्यावर निरपेक्ष प्रेम केले आणि आम्हा सर्वांनाच ‘आदर्श साधक’ घडवण्याचा प्रयत्न केला. अशा आजीच्या सहवासात जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली काही सूत्रे अन् तिचे अमूल्य मार्गदर्शन गुरुचरणी अर्पण करते.
४ अ १. गोष्टीतून ज्ञानामृत पाजणारी माझी आजी ! : मी ३ – ४ वर्षांची असल्यापासूनच शाळेला सुटी लागली की, मला आजीकडे जायची ओढ लागायची. आजीला भेटताक्षणी मला पुष्कळ आनंद आणि समाधान वाटायचे. ती रात्री झोपतांना मला रामायण आणि महाभारत यांतील गोष्टी सांगायची अन् ‘त्यातून काय शिकायला मिळाले ?’, हे मला विचारायची.
४ अ २. आजीचा रामनामाचा जप ऐकून नातीवरही रामनामाच्या जपाचा संस्कार होणे : एकदा कुडाळ सेवाकेंद्रातून रामनाम दिंडी काढली होती. आजी वयोवृद्ध असूनही साधकांच्या समवेत पूर्ण दिंडीत चालली होती. आजीची प्रभु श्रीरामचंद्रावर पुष्कळ श्रद्धा होती. तिच्यामुळे मला लहानपणी रामनामाची गोडी लागली. त्यामुळे माझा अखंड ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ असा नामजप होऊ लागला.
४ अ ३. नातवंडांकडून प्रतिदिन स्तोत्रे आणि आरत्या म्हणवून घेऊन त्यांच्या साधनेची केलेली पायाभरणी : आजीने आम्हा भावंडांवर लहानपणापासूनच ‘सतत नामजप करणे, सायंकाळी स्तोत्रपठण करणे, आरत्या म्हणणे’ हे संस्कार केले. तिने आमच्याकडून कठीण असलेली संस्कृत भाषेतील स्तोत्रेही पाठ करवून घेतली. तिने आम्हाला अनेक भक्तीगीतेही शिकवली. आमच्या कोवळ्या मनावर साधनेचा संस्कार करून आम्हाला साधकपुष्प बनवण्याच्या दृष्टीने तिने आमची केलेली ती पायाभरणीच होती.
४ अ ४. सद्यःस्थितीविषयी नातवंडांना अवगत करून साधना वाढवण्यासाठी उद्युक्त करणे : आजी ‘तिच्या वेळी असलेली स्थिती आणि सद्यःस्थिती’ यांविषयी आम्हा भावंडांशी नेहमी बोलत असे. सद्यःस्थितीत ‘धर्माला कशी ग्लानी आली आहे ? धर्मांध भारतभूमीचे लचके कसे तोडत आहेत ?’, यांविषयी सांगून ती आम्हाला म्हणायची, ‘‘यावर केवळ एकच उपाय आणि तो म्हणजे ‘गुरुमाऊलीने शिकवलेली साधना करणे आणि सनातन धर्माचे पालन करणे !’’ त्या वेळी तिचे ते मार्गदर्शन म्हणजे आमच्यासाठी जणू लहान हिंदु राष्ट्र-जागृती सभाच असायची. तिची मृदु आणि गोड वाणी ऐकून ‘परम पूज्यच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) आमच्याशी बोलत आहेत’, असे वाटून आमची भावजागृती व्हायची.
४ अ ५. आजीकडून भावस्थितीत रहायला शिकता येणे : आजीची वाणी अत्यंत मधुर होती. जणू ती ‘अखंड भावावस्थेत असून शब्द न उच्चारता सतत नामस्मरणच करत आहे’, असे मला जाणवायचे. यातून आजीच्या मुखात सतत असलेले ‘राम’ अन् ‘कृष्ण’ यांचे नाम आणि तिचे ईश्वराशी सतत असलेले अनुसंधान पाहून ‘सतत भावावस्थेत कसे रहायचे ?’, ते मला तिच्याकडून शिकायला मिळाले.
४ अ ६. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याविषयी असलेला आदर आणि कृतज्ञताभाव : सद्गुरु स्वातीमावशी (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) आधी संत झाल्या आणि त्यानंतर काहीच वर्षांनी सद्गुरुही झाल्या. तेव्हा ती आनंदवार्ता ऐकून आजीने आम्हा सर्वांना सांगितले, ‘‘तुम्हालाही असेच त्यांच्याकडून (सद्गुरु स्वातीताई यांच्याकडून) शिकून पुढे जायचे आहे. त्या सभेमध्ये विषय मांडतात, तसे तुम्हालाही बोलता आले पाहिजे.’’ आजीच्या बोलण्यातून ‘सद्गुरु स्वातीमावशी सद्गुरु आहेत’, याचा पुष्कळ कृतज्ञताभाव जाणवत असे.’
४ आ. कु. प्रिया मिसाळ (कै. खाडयेआजी यांच्या मोठ्या मुलीची मुलगी), ओरोस, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
४ आ १. आजीने नातवंडांना स्वतःच्या समवेत स्तोत्रपठण, आरती आणि नामजप यांसाठी बसवून अगदी लहान वयापासून त्यांच्यावर साधनेचे संस्कार करणे : लहानपणी मी आणि ताई (कु. वैष्णवी मिसाळ) सुटीत आजोळी (आईच्या माहेरी), म्हणजे कुडाळला आजीकडे जायचो. तेव्हा आजी आम्हाला स्तोत्रे शिकवायची. अन्य आजी-आजोबा त्यांच्या नातवंडांना फिरवतात, त्यांना खाऊ भरवतात आणि चिमणी-कावळ्यांच्या गोष्टी सांगतात; मात्र आमची आजी आम्हा नातवंडांना लहान वयापासूनच स्वतःसमवेत स्तोत्रपठण, आरती आणि नामजप या सर्वांसाठी बसवत असे. तिने आम्हाला लहान वयातच साधना शिकवली.
४ आ २. प्रसंगी रागावून किंवा शिक्षा करून आजीने नातवंडांना शिस्त लावणे : आजी पनवेल येथे आमच्या घरी आल्यावर लहान-सहान गोष्टी सांगून आम्हाला घडवण्याचा प्रयत्न करायची. आजी नेहमीच तत्त्वनिष्ठतेने वागायची. तिने प्रसंगी आम्हाला दटावून किंवा शिक्षा करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.
४ आ ३. हिंदूंवरील अन्याय आणि धर्महानी यांविषयी आजीला पुष्कळ चीड असणे : आजी नियमितपणे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करायची. आजी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत असतांना मी तेथे वावरत असेन, तर ती मला बोलवून त्यातील धर्महानीचे प्रसंग वाचून दाखवायची. आजीला धर्मावरील आघात आणि समाजात घडणाऱ्या अनिष्ट घटना वाचून पुष्कळ चीड यायची.’
४ इ. कु. वैदेही मनोज खाड्ये (कै. खाडयेआजींच्या मोठ्या मुलाची मुलगी (वय १५ वर्षे)), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
४ इ १. आजी तिच्या लहानपणीच्या गंमती सांगून त्यातून शिकवत असणे : ‘आजी मला तिच्या लहानपणीच्या आणि मला आवश्यक असलेल्या गोष्टी सांगायची. ती माझ्याशी लहान होऊन खेळायची. ती मला नवीन खेळही सुचवायची. आजीकडे तिच्या लहानपणीच्या गंमतीजंमतीचे भांडार होते. त्यातून ती मला शिकवत होती.
४ इ २. इतरांचा विचार करणे : आजी पडल्यावर तिला हालचाल करता येत नव्हती. तिला उचलून आसंदीत बसवावे लागत होते किंवा उचलून पलंगावर झोपवावे लागत होते. तेव्हा तिच्या मनात विचार यायचे, ‘यांना माझे सगळे करायला लागते. माझ्यामुळे यांना त्रास होतो’, तरीही ती पुष्कळ स्थिर रहाण्याचा प्रयत्न करायची.
‘हे गुरुदेवा, प्रेमळ, सर्वांची काळजी घेणारी, आमचे लाड करणारी, आमच्या चुका सांगून आम्हाला व्यष्टी साधनेत साहाय्य करणारी आजी आम्हाला लाभली. तिच्या माध्यमातून आम्हाला पुष्कळ काही शिकायला मिळाले. तिचा चैतन्यमय सहवास लाभला’, याबद्दल आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’
४ ई. कु. सानिया संजय खाडये, (कै. खाडयेआजी यांच्या लहान मुलाची मुलगी, (वय १७ वर्षे)), पिंपरी, पुणे.
४ ई १. प्रेमळ : ‘आजीचे सर्व कुटुंबीय आणि आम्ही सर्व नातवंडे यांवर पुष्कळ प्रेम होते.
४ ई २. साधनेची तळमळ : आजीच्या वागण्या-बोलण्यातून तिची ईश्वरप्राप्तीची तळमळ दिसायची. ती नेहमीच आम्हाला साधना करायला सांगायची. मला तिच्याकडून साधनेसाठी नेहमीच प्रेरणा मिळायची.’ (१३.६.२०२१)