१३ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित !
मुंबई – महापालिकांची आरक्षणाची सोडत ३१ मे या दिवशी काढण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याच्या निवडणूक आयोगाने केली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरारसह राज्यातील १३ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे. १३ जून या दिवशी आरक्षण घोषित करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची सिद्धता चालू केली आहे. यामधील १३ महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
आरक्षणाची नोटीस २७ मे या दिवशी प्रसिद्ध होणार आहे. जागा निश्चितीसाठी आरक्षण सोडत ३१ मे, प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करणे १ जून, आरक्षणावर हरकती आणि सूचना मागवणे १ ते ६ जून, आरक्षण घोषित करणे १३ जून अशा प्रकारे निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे.