बैठकीत आरक्षणाचा मुद्दा निघालाच नाही ! – ब्राह्मण महासंघाचा दावा
पुणे येथील शरद पवार यांच्यासमवेत झालेली ब्राह्मण समाजाची बैठक
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ‘ब्राह्मणांना आरक्षण हवे’, हे सूत्रच आले नाही. यासंबंधी सर्व ठिकाणी विपर्यस्त वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘कुणालाच आरक्षण नको’, अशी काही जणांची भूमिका होती; मात्र पवार यांनी त्याचे खंडन करतांना ‘दलित, आदिवासी, तसेच मागास समाजाला त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी आरक्षण असायला हवे’, अशी भूमिका व्यक्त केली. ब्राह्मण समाजाचा कोणत्याही आरक्षणाला विरोध नाही. घटनेने दिलेले आरक्षण समाजाला मान्यच आहे. पवार यासंदर्भात जे सांगतायेत ते खोटे असल्याचा दावा ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’चे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केला. राज्यातील १२ संघटनांच्या ४० प्रतिनिधींची पवार यांच्या समवेत पुण्यामध्ये काही सूत्रांवरून बैठक झाली होती. बैठकीला उपस्थित अन्य ५ संघटनांनीही असा खुलासा केल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला आहे.
शरद पवारांकडून वेगळे रूप देण्याचा प्रयत्न ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघब्राह्मण महासंघाचे आनंद दवे हे शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित नव्हते; मात्र त्यांनी पवारांच्या आरक्षणाविषयीच्या दाव्यावरून जोरदार टीका केली आहे. शरद पवारांनी केलेले ‘ट्वीट’ नाही, तर ‘ट्विस्ट’ आहे. बैठकीला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न आहे. ‘कोणत्याही विशिष्ट जातीच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, तर जातीय आरक्षणाला आमचा विरोध आहे. आरक्षणाचा लाभ केवळ गरिबांना व्हावा. मग तो कोणत्याही जातीचा असो’, हीच आमची भूमिका होती आणि आहे. |