अडीच वर्षांच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, भाजप
सांगली, २४ मे (वार्ता.) – विदर्भ-मराठवाडा येथे ‘महाजनको’ने बियाणांच्या मूल्यात प्रचंड दरवाढ केली असून २ सहस्र २५० रुपयांना मिळणारे बियाणे आता ४ सहस्र २५० रुपयांना मिळत आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. अडीच वर्षांच्या कालावधीत महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, शेतकर्यांच्या समस्या यांसह सर्वच आघाड्यांवर महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलेले आहे. या सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे पहाण्यास वेळ नसून हे सरकार स्थानांतरण आणि वसुली यातच मग्न आहे, अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी भाजप आमदार सुधीर गाडगीळ, भाजप आमदार सुरेश खाडे, सरचिटणीस केदार खाडिलकर यांसह अन्य उपस्थित होते.
प्रवीण दरेकर या वेळी म्हणाले,
१. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात कपात केल्यावर राज्य सरकारने किमान ३ ते ४ रुपयांचा दिलासा राज्यातील जनतेला देणे अपेक्षित होते; मात्र तसे न करता अत्यल्प दिलासा देऊन महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०२४ पर्यंत प्रत्येकाच्या घरात पाण्यासाठी ‘जलजीवन मिशन’चा संकल्प घेतला आहे. यात महाराष्ट्राचे काम केवळ १५ टक्के झाले आहे. हे काम झाल्यास त्याचे श्रेय भाजपला मिळेल, असा चुकीचा दृष्टीकोन ठेवून राज्यातील सरकारने त्या संदर्भातील काम जाणीवपूर्वक केले नाही. यामुळे ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणात पाण्यापासून वंचित रहात आहे.
३. महाराष्ट्र राज्याची केंद्र सरकारकडे सहस्रो कोटी रुपयांची मूल्यवर्धित कराची थकबाकी असल्याची माहिती खोटी असून केंद्र सरकारकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही.
४. मनसेचे प्रमुख राज ठाकरे हिंदुत्वाच्या संदर्भात भूमिका घेत असल्याने त्यांना आमचा पाठिंबा आहे.
५. कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा महाविकास आघाडी सरकारला राजकीयदृष्ट्या ‘गेम’ करावयाचा आहे; कारण अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संभाजीराजे यांना पाठिंबा घोषित करतात आणि शिवसेना अधिकृत प्रवेशाविना पाठिंबा देणार नाही म्हणते, या परस्परविरोधी भूमिका आहेत.