प्रतीक्षा दाऊदच्या मुसक्या आवळण्याची !
वर्ष १९९३ मधील मुंबईतील साखळी बाँबस्फोटातील मुख्य सूत्रधार कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम कराचीत आहे, अशी माहिती दाऊदची बहीण हसिना पारकरचा मुलगा म्हणजे दाऊदचा भाचा अलीशाह पारकर याने अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीत दिली आहे. पाकिस्तानने दाऊदला आश्रय दिला आहे, यात नवीन असे काहीच नाही. ‘दाऊदचा आश्रयदाता पाकिस्तान आहे’, हे उघड गुपित सर्व जगाला ठाऊक आहे. देशातील राष्ट्रप्रेमींना दाऊद कुठे आहे ? याची नव्हे, तर त्याच्या मुसक्या बांधून त्याला भारतात कधी आणणार ? याची प्रतीक्षा आहे.
११ सप्टेंबर २००१ या दिवशी ‘अल् कायदा’ या आतंकवादी संघटनेने अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या २ इमारतींमध्ये विमान घुसवून जिहादी आक्रमण केले. यात ३ सहस्र लोक ठार, तर २५ सहस्रांहून अधिक नागरिक घायाळ झाले. या आक्रमणानंतर अल् कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला पकडण्यासाठी अमेरिकेने आकाशपाताळ एक केले. तब्बल १० वर्षांनी म्हणजे वर्ष २०११ मध्ये अमेरिकेच्या सैन्याने पाकिस्तानात घुसून लादेनला ठार केले. मुंबईत वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांचा आरोपी पाकिस्तानमध्ये लपला आहे. अमेरिकेने ज्याप्रमाणे लादेनला धडा शिकवला, तसा धडा भारत दाऊदला कधी शिकवणार ? हा देशवासियांचा प्रश्न आहे. ‘पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या सीमेत जाऊन जो पराक्रम दाखवला, त्यानंतर दाऊदलाही अशाच प्रकारे धडा शिकवला जाईल’, अशी आशा देशवासियांमध्ये पल्लवित झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रहित करणे, अयोध्येत राममंदिर बांधणे या घोषणा पूर्ण केल्या. त्यासमवेत आता ‘दाऊदला भारतात आणण्याचीही घोषणा त्यांनी पूर्ण करावी’, असे राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते.
‘वल्ड ट्रेड’वर जेव्हा आक्रमण झाले, तेव्हा जॉर्ज बुश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते; मात्र लादेनला धडा शिकवण्याची कामगिरी १० वर्षांनंतर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असतांना पार पडली. यातून राष्ट्रवादाला सर्वाेच्च स्थान देण्याचे अमेरिकेचे धोरण दिसून येते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या संरक्षणाला नेहमीच दुय्यम स्थान दिले. त्याचा परिणाम पाकिस्तान आणि चीन यांच्या आक्रमणाच्या वेळी देशाला भोगावा लागला. त्यानंतर लाभलेल्या पंतप्रधानांपैकी लालबहाद्दूर शास्त्री आणि श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारताची सैनिकी ताकद शत्रूला दाखवून दिली. या दोन्ही पंतप्रधानांच्या काळात भारताने पाकिस्तानला नामोहरम केले; परंतु जिंकलेला काश्मीरचा भूभाग ताश्कंद कराराच्या वेळी पुन्हा पाकिस्तानला दिला गेला. नंतर वर्ष १९७२ मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानशी युद्ध करतांना ओलीस ठेवलेल्या ९० सहस्र पाकिस्तानी सैनिकांच्या बदल्यात पाकव्याप्त काश्मीरची मागणी केली नाही. या इतिहासातील घोडचुका मानल्या जातात. आपण युद्ध जिंकलो; परंतु तहात हरलो. पंतप्रधान मोदी यांच्या काळात मात्र ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे वर्चस्व निर्माण झाले आहे, ते दाऊदला देशात आणण्यासाठी नक्कीच पोषक ठरणारे आहे.
दाऊदच्या कारवायांचे धागेदोरे !
दाऊदचा संबंध केवळ मुंबईतील साखळी बाँबस्फोटापुरता मर्यादित नाही. मुंबई आणि देश यांच्या अर्थकारणाशीही त्याचा मोठा संबंध आहे. हिंदी चित्रपटसृष्टीशी दाऊदचा संबंध लपलेला नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींची नावे दाऊदशी जोडली गेली आहेत. काही अभिनेत्यांचा थेट दाऊदशी संबंध आला आहे. हिंदी चित्रपटांतील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान, लव्ह जिहादला उत्तेजन देणारे चित्रपट हे सर्व प्रकार ‘डी गँग’कडून मिळणाऱ्या अर्थपुरवठ्यामुळेच शक्य आहे. दिवंगत अभिनेता ऋषि कपूर याने स्वत: दाऊदची भेट घेतल्याची स्वीकृती दिली होती. मुंबई बाँबस्फोटापूर्वी अभिनेता संजय दत्त याच्याकडे मिळालेला शस्त्रसाठा हे दाऊदचे हिंदी चित्रपटसृष्टीचे पाय किती खोल रुजले आहेत, हेच दर्शवत होते. मुंबईसह देशातील अमली पदार्थांची तस्करी, क्रिकेटमधील सट्टेबाजी, महिलांची तस्करी, अवैध शस्त्रांची देवाण-घेवाण यांमध्ये आजही त्याचे वर्चस्व आहे. त्यामुळे दाऊदच्या मुसक्या आवळणे म्हणजे मुंबईसह देशातील गुन्हेगार जगताची नांगी ठेचण्यासारखे आहे.
मुत्सद्दीपणा दाखवा !
जम्मू-काश्मीर येथील कलम ३७० हटवण्याच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या पलीकडे काहीच करू शकले नाहीत, हा मोदी यांचा मुत्सद्दीपणा होय. दाऊदच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे नेतृत्व सिद्ध करून दाखवावे. दाऊदचे वर्चस्व मोडून काढणे काँग्रेसच्या काळात शक्य झाले नाही; मात्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विशेषत: मागील २-३ वर्षांत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणांनी दाऊदच्या अनेक मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत. दाऊदची बँक खाती गोठवली आहेत. त्याची मालमत्ता लिलावात काढली आहे. त्याच्या अनेक सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मोदी यांच्या सत्ताकाळात होत असलेल्या या कारवाया निश्चित कौतुकास्पद आहेत; मात्र आता यापुढे जाऊन ठोस कारवाई करण्याची वेळ आली आहे. अमेरिकेने १० वर्षांनंतर लादेनला नष्ट केले. मुंबईतील साखळी बाँबस्फोटांना २० वर्षे होत आली आहेत. त्यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी देशाला आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार आहे ? लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानची अनुमती घेतली नव्हती. अमेरिकेने स्वत:च्या बळावरच शत्रूला संपवले. आताच्या शासनानेही राष्ट्रहिताची पावले उचलावीत, अशी भारतियांना अपेक्षा आहे !
दाऊद कुठे आहे ? या माहितीची नाही, तर त्याच्या मुसक्या आवळून आणल्याची भारतियांना प्रतीक्षा आहे ! |