‘विश्वसुंदरी’ नको, तर ‘वृक्षसुंदरी किताब’ चालू करण्याची आवश्यकता ! – सयाजी शिंदे, अभिनेता
बार्शी (सोलापूर) येथे ‘मातृभूमी प्रतिष्ठान’च्या वतीने ‘भगवंत व्याख्यानमाले’चा शुभारंभ !
बार्शी (जिल्हा सोलापूर) – निसर्गाचा बिघडत असलेला समतोल, ही मानवासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. वृक्ष लागवड आणि झाडे जगवणे हे व्हायलाच हवे. आज सर्वत्र विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल केली जात आहे, हे चुकीचे आहे. आता ‘विश्वसुंदरी’ नको, तर ‘वृक्षसुंदरी’ किताब चालू करण्याची आवश्यकता आहे, असे मत अभिनेते आणि ‘सह्याद्री देवराई’चे प्रमुख सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ते २२ मे या दिवशी ‘मातृभूमी प्रतिष्ठान’ आणि ‘श्री भगवंत मल्टिस्टेट बार्शी’च्या वतीने भगवंत प्रकटोत्सव निमित्त आयोजित ‘भगवंत व्याख्यानमालेत’ ‘आस्था आणि अनास्था’या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘शिवाजी शिक्षण संस्थे’चे सचिव पी.टी. पाटील होते. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ३ दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘मातृभूमी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष संतोष ठोंबरे, ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले, उद्योजक शशिकांत जगदाळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सयाजी शिंदे पुढे म्हणाले, ‘‘शालेय जीवनापासूनच मुलांना झाडांचे महत्त्व पटवून द्या. शाळेत जन्मदाखल्यासमवेत देशी झाडांच्या बिया घेऊन आल्याविना प्रवेश देऊ नका, मुलांना अ, आ, इ शिकवण्याआधी बी आणि झाडांचे महत्त्व समजावून सांगा. शाळेत झाडांविषयी चर्चा व्हायला हवी. प्रत्येक शाळेत ‘बीज बँक’ बनायला हवी, त्याची रोपवाटिका बनवून पुढे प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे.’’