संभाजीनगरला पाणी मिळाल्याविना आमचा जल आक्रोश संपणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, भाजप
संभाजीनगर महापालिकेवर पाण्यासाठी भाजपचा ‘जल आक्रोश’ मोर्चा !
संभाजीनगर, २३ मे (वार्ता.) – वर्षानुवर्षे सातत्याने संभाजीनगर महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मी मुख्यमंत्री असतांना पाणीयोजना संमत करून १ सहस्र ६८० कोटी रुपये दिले होते; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आजचा मोर्चा सत्ता मिळवण्यासाठी नसून भ्रष्टाचारांची भ्रष्ट व्यवस्था पालटून सामान्य माणसाला पाणी देण्यासाठी आहे. हा मोर्चा भाजपचा नसून यात तमाम संभाजीनगरवासीय सहभागी आहेत. त्यामुळे संभाजीनगरला पाणी मिळाल्याविना आमचा जल आक्रोश संपणार नाही, अशी चेतावणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते भाजपच्या ‘जल आक्रोश’ मोर्च्यात पत्रकारांशी बोलत होते. या मोर्च्यात भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
येथील पैठण गेटपासून प्रारंभ झालेल्या मोर्च्याला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. शेकडो महिला रिकामे हंडे घेऊन मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्च्यात उंटाच्या पाठीवर रिकामे हंडे ठेवण्यात आले होते. एक ८० वर्षीय आजी रिकामा हंडा घेऊन त्यांच्या कुटुंबियांसमवेत सहभागी झाल्या होत्या. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महापालिकेत कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास पैसे नाहीत. जोपर्यंत संभाजीनगरचा पाणीप्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू.’’