प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे !
‘तमिळनाडूमधील चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी नाडीपट्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे १५.१.२०२२ या दिवशी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ‘प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ’ करण्यात आला. या यज्ञात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी लाल मिरच्यांच्या आहुती दिल्या. ‘प्रत्यंगिरादेवी’ ही श्रीविष्णूच्या नृसिंह अवताराची शक्ती आहे. ही देवी वाईट शक्तींचा त्रास दूर करणारी आहे. या यज्ञाच्या वेळी मला पुढीलप्रमाणे जाणवले . . .
१. सायंकाळी ६.५५ वाजता यज्ञाला आरंभ होत असतांना स्वतःच्या तोंडवळ्यावर काळ्या (त्रासदायक) शक्तीचे आवरण जाणवणे
हे आवरण यज्ञस्थळी वातावरणात जो त्रास मला जाणवत होता, त्याचे निर्देशक होते.
२. यज्ञाला आरंभ झाल्यानंतर ५ मिनिटांतच तोंडवळ्यावरील आवरण दूर झाल्याचे, म्हणजेच वातावरणातील त्रासदायक स्पंदने नष्ट झाल्याचे जाणवणे
यावरून यज्ञाचा वातावरणावर केवढा परिणाम होतो, हे यातून शिकायला मिळाले.
३. यज्ञातून प्रक्षेपित होणाऱ्या स्पंदनांचा परिणाम मणिपूरचक्रावर जाणवू लागणे
यज्ञातून प्रक्षेपित होणाऱ्या शक्तीच्या स्पंदनांचा हा परिणाम होता. शक्तीची स्पंदने मला तेजतत्त्वाशी संबंधित मणिपूरचक्रावर जाणवली.
४. यज्ञाला आरंभ होऊन १७ मिनिटे झाल्यावर (सायंकाळी ७.१२ वाजता) यज्ञाची स्पंदने मला माझ्या मूलाधारचक्रावर जाणवू लागली आणि तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.
४ अ. यज्ञाच्या स्पंदनांचा प्रवास अजून सहस्रारचक्रापर्यंत जाणे बाकी असणे : यज्ञातील आहुतींच्या वेळी यज्ञाची स्पंदने मूलाधारचक्रावर जाणवली. यज्ञाच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणजे यज्ञाची स्पंदने सहस्रारचक्रावर जाणवणे. हे जाणवल्यावर ‘साधकांवर या यज्ञाचा पूर्णतः परिणाम झाला’, असे म्हणू शकतो. सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवू लागल्यावर ब्रह्मरंध्र उघडले जाऊन पुढे ती स्पंदने वातावरणावर परिणाम करू लागतात. याचा अर्थ त्या वेळी ‘यज्ञाच्या समष्टी कार्याला आरंभ झाला’, असे आपण म्हणू शकतो. आतापर्यंत यज्ञातून प्रक्षेपित होणाऱ्या स्पंदनांचा अर्धाच प्रवास पूर्ण झाल्याचे लक्षात आले.
४ आ. यज्ञामध्ये मूलाधारचक्र जागृत व्हायला ३० टक्के आहुती द्याव्या लागणे, तर सहस्रारचक्र जागृत व्हायला ७० टक्के आहुती द्याव्या लागणे, तसेच १०८ या संख्येचे महत्त्वही लक्षात येणे : यज्ञामध्ये १०८ आहुती द्यायच्या असल्यास त्याच्या ३० टक्के आहुती, म्हणजे ३६ आहुती झाल्यावर बरोबर मूलाधारचक्र जागृत होते, तर पुढे १०८ व्या आहुतीला, म्हणजे उरलेल्या ७० टक्के, म्हणजे ७२ आहुती झाल्यावर बरोबर सहस्रारचक्र जागृत होते. यातून ‘देवाची लीला कशी आहे’, हे लक्षात येते. ‘धन्वन्तरि यज्ञा’च्या वेळी मूलाधारचक्रापर्यंतचा प्रवास व्हायला १०८ (१ जपमाळ) आहुती द्याव्या लागल्या, तर पुढे सहस्रारचक्रापर्यंतचा प्रवास व्हायला २१६ (२ जपमाळा) आहुती द्याव्या लागल्या. तेव्हाही ‘३० टक्के : ७० टक्के’ हे प्रमाण होते. यावरून देवाचे गणित कसे असते, हेही लक्षात आले. तसेच १०८ या संख्येचे महत्त्वही लक्षात आले.
४ इ. यज्ञाची स्पंदने मूलाधारचक्रावर जाणवू लागल्यावर यज्ञस्थळी ठेवलेले प्रत्यंगिरादेवीचे चित्र आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्यावरील, तसेच यज्ञाला उपस्थित असलेल्या साधकांच्या तोंडवळ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर झाल्याचे जाणवणे : यज्ञाचा परिणाम न्यून करण्यासाठी वाईट शक्ती आक्रमण करून वातावरणात काळी (त्रासदायक) शक्ती पसरवतात. तिचा परिणाम यज्ञाच्या वेळी काळ्या शक्तीचे आवरण येण्यावर होतो. मला हे आवरण दूर झालेले जाणवले. बरोबर त्याच वेळी यज्ञामध्ये आहुतींसाठी सहभागी झालेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘प्रत्यंगिरादेवीचे चित्र आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आता उजळले आहे’, असे सांगितले.
५. यज्ञाची स्पंदने मूलाधारचक्र ते सहस्रारचक्र जात असतांना यज्ञातून प्रक्षेपित होणाऱ्या स्पंदनांमध्ये झालेले पालट
६. यज्ञकुंडातून शक्ती, चैतन्य, आनंद यांपैकी आवश्यक ती स्पंदने आवश्यक त्यावेळी कशी प्रक्षेपित होतात, हे शिकायला मिळणे
प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ करण्याचा उद्देश ‘साधकांना होत असलेला वाईट शक्तींचा त्रास दूर करणे’, हा होता. या यज्ञाच्या वेळी ‘देवीची शक्ती यज्ञकुंडातून वेगाने प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवत होते. जेव्हा देवीची शक्ती यज्ञकुंडातून प्रक्षेपित होत होती, तेव्हा त्या चांगल्या शक्तीचे जडत्व शरिराला जाणवत होते, तसेच यज्ञकुंडातून पांढरा धूरही वेगाने वरच्या दिशेने जाऊन वातावरणात पसरत होता. यावरून या धुराचे कार्य ‘शक्ती वातावरणात प्रक्षेपित करणे, हे होते’, असे लक्षात आले. यज्ञाच्या शक्तीचे कार्य (वाईट शक्तींचे निर्मूलन) पूर्ण झाल्यावर प्रथम वातावरणात चैतन्य आणि काही वेळाने आनंद जाणवू लागला. यावरून ‘यज्ञकुंडातून आवश्यक ती स्पंदने आवश्यक त्या वेळी कशी प्रक्षेपित होतात’, हे शिकायला मिळाले.
७. कृतज्ञता
प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने या सर्व नाविन्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळाल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.१.२०२२)
|