ज्यांचे कर राष्ट्राला सावरतात, ते सावरकर !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने २१ ते २८ मे २०२२ या कालावधीत प्रतिदिनची लेखमाला…
‘प्राचार्य शिवाजीराव भोसले ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी कर्जतला आले होते. तेव्हा त्यांनी ‘सावरकर’ या शब्दाची व्याख्या ‘ज्यांचे कर राष्ट्राला सावरतात ते सावरकर !’, अशी केली होती. याचा अर्थ ही व्याख्या सावरकर आडनाव असणार्या सर्वांना मुळीच लागू पडत नाही. अगदी सावरकरांच्या कुटुंबियांनाही, जरी त्यांचा त्याग मोठा असला तरीही. इतकेच काय त्यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकरांनाही ही व्याख्या लागू होत नाही. ही व्याख्या लागू होते केवळ अन् केवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आणि यांनाच. याचा अर्थ सावरकर कुटुंबियांचा त्याग अल्प होता असे नव्हे, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तीमत्त्व बहुआयामी होते !
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी देशासाठी सोसलेल्या यातना
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करून सूर्यावर थुंकण्याचा आणि ती थुंकी आपल्याच अंगावर पाडून घेण्याचा किळसवाणा प्रकार काही मंडळी करत असतात. सावरकर कुटुंबियांनी त्यांचे उभे आयुष्य देशासाठी अक्षरशः चंदनासारखे झिजवले. सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर हेही महान देशभक्त होते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेचे जनक तेच ! काळ्या पाण्याची शिक्षा बाबारावांना झाली होती. सावरकर यांचे लहान बंधू नारायणराव सावरकर पेशाने डॉक्टर होते; पण यांच्या नशिबी काय आले ? गांधीजींचा वध झाल्यानंतर त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना नाहक गोवले गेले. गांधीजींना मारणारा नथुराम गोडसे हा ब्राह्मण होता; म्हणून त्याचा राग ब्राह्मण असणार्या सावरकरांच्या कुटुंबियांवर काढला गेला. त्या वेळी ‘सावरकर सदना’वर जमाव चालून गेला. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असीम त्याग केला, त्या नारायणरावांच्या डोक्यात जमावाने दगड घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तर खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधी हत्येचे दोषी मानून त्यांना न्यायालयाच्या पायर्या चढायला लावल्या. यासारखे दुर्दैव दुसर्या कोणत्याही नेत्याच्या वाट्याला आले नसेल.’
– संजय वझेकर (साभार : मासिक ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी २०२१)
किती जणांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा असा विचार आहे ?
‘क्रांतीचा खरा अर्थ सध्याच्या अर्थरचनेत ‘पालट’ हाच आहे. क्रांती हा मनुष्याचा निसर्गदत्त अधिकार आहे. स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. या ध्येयवादासाठी आणि निष्ठेसाठी आमच्या वाट्याला येणार्या कोणत्याही हालअपेष्टांचे आणि यातनांचे आम्ही स्वागतच करू. क्रांतीच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी आम्ही आमचे तारुण्य धूप म्हणूनच आणलेले आहे; कारण या दिव्य ध्येयासाठी होणारा कोणताही त्याग सुयोग्यच ठरेल. आम्ही या क्रांतीच्या आगमनाची वाट पहात आहोत.’
– भगतसिंह
(साभार : मासिक ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी २०२१)