महाराष्ट्रात आयात कोळसा वापरण्यास प्रारंभ

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – विजेची वाढती मागणी आणि कोळशाचा अपुरा पुरवठा या पार्श्वभूमीवर आयात कोळसा वापरण्याविषयी केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार महाजनकोने आयात कोळशाचा वापर चालू केला आहे. अदानी एंटरप्रायजेस, गांधार ऑईल रिफायनरी आणि मोहित मिनरल्स या ३ उद्योजकांकडून महाजनकोने २० लाख टन आयात कोळशाची खरेदी केली आहे. या महागड्या कोळशामुळे वीजग्राहकांवर प्रतियुनिट ६० पैसे ते १ रुपया दरवाढीचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी १५ नोव्हेंबर या दिवशी ही निविदा काढली होती.

आयात कोळशाच्या पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात भारनियमन टळले !

खापरखेडा (१ ते ५ संच), चंद्रपूर (३ ते ९ संच), भुसावळ (४ ते ५ संच) आणि नाशिक (३ ते ५ संच) या प्रकल्पांना हा कोळसा पुरवण्यात येत आहे. विजेचा वाढता वापर पहाता कोळशाची टंचाई पुढील २ वर्षे रहाण्याची शक्यता महाजनकोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त केली असून अन्य राज्यांत भारनियमन चालू झाले असले, तरी आयात कोळशाच्या पुरवठ्यामुळे महाराष्ट्राने हा कोळसा मागवून भारनियमन टाळले असल्याचे त्यांनी सांगितले.