भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन चालूच राहील ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
पुणे – भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन एक दिवसाचे नाही. धर्मांध लोक तुमची चाचपणी करत आहेत. तुम्ही थंड गोळे होऊन राहिलात, तर त्यांचे आवाज पुन्हा वाढतील. आताच ती वेळ आहे. भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन चालूच राहील, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. येथील ‘गणेश कला क्रीडा मंच’ येथे त्यांची २२ मे या दिवशी सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी अयोध्या दौरा रहित करण्याविषयीची कारणे स्पष्ट करत ‘हिंदूंनी जागृत आणि सावध रहावे’, असे आवाहन केले. ‘भोंग्यांच्या विरोधात पत्र सिद्ध करत असून लवकरच हे पत्र प्रसिद्ध करण्यात येईल. हे पत्र प्रत्येक हिंदु बांधवाच्या घरी पोचवायचे आहे’, असेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी मांडलेली काही ठळक सूत्रे
१. अयोध्येला गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांच्यावर खटले प्रविष्ट झाले असते. याचे पूर्वनियोजन महाराष्ट्रातूनच काही जणांकडून करण्यात आले होते; म्हणून अयोध्या दौरा तूर्तास रहित केला.
२. खरे हिंदुत्व काय आहे, याचे परिणाम हिंदूंना हवे आहेत. ते परिणाम आम्ही देत आहोत. उद्धव ठाकरे यांच्यावर आंदोलन केल्याविषयी एकतरी खटला आहे का ? केवळ तुम्ही म्हणालात म्हणून ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ होत नाही. संभाजीनगर नामकरणानंतर राजकारणाचा प्रश्नच मिटेल; म्हणून त्याचे नामकरण केले जात नाही. माझ्या मागील एका सभेत मी पंतप्रधानांना आवाहन केले होते की, समान नागरी कायदा आणावा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा आणि ‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करावे. शरद पवार यांना औरंगजेब हा सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलावे ?
३. मतांच्या ध्रुवीकरणासाठी एम्.आय.एम्. पक्षाला मोठे होऊ दिले गेले. आपण राक्षस वाढवत आहोत, हे त्यांच्या लक्षात आले नाही. या निझामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. ज्या औरंग्याची कबर महाराष्ट्रात बांधली गेली, आज त्याच कबरीचे मशिदीत रूपांतर झाले आहे.
४. महाराष्ट्रात एम्.आय.एम्.ची औलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्याच्या कबरीवर जाऊन माथा टेकते ! त्याचे आम्हाला काहीच वाटत नाही ? आम्ही सतत बेसावध राहिलो. त्यामुळे आमचा देश पारतंत्र्यात गेला. हिदूंनो, बेसावध राहू नका.