विवाह संस्काराचे बाजारीकरण नको !

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एक युवक गवंडी (बांधकाम) काम करतो. गावातीलच एका मध्यस्थाने त्या युवकाचा विवाह ठरवून दिला. विवाहात वधूला २५ सहस्र रुपयांचे दागिने आणि विवाहानंतर १ लाख ७० सहस्र रुपये रोख देण्याचे ठरले. यानंतर त्यांचा ठरल्या तिथीला जानेवारीत विवाह पार पडला. विवाहानंतर चारच दिवसांत वधूची आई चाळीसगाव येथे येऊन ‘नवसासाठी मुलीला माहेरी घेऊन जाते’, असे सांगून तिला घेऊन गेली. ती अजूनही सासरी परतली नाही. शेवटी वराने पोलिसांकडे तक्रार नोंदवली अन् मध्यस्थासह ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्ह्यात घडलेली ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. अशा घटना अन्य राज्यात म्हणजे पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश येथेही घडत आहेत. पोलीस अन्वेषणात असेही आढळून आले की, त्या वधूचे यापूर्वी अनेक विवाह झालेले आहेत. अनेकांना त्यांनी लुबाडलेले आहे. या प्रकरणी मध्यस्थांचा सुळसुळाट आहे. यामुळे पवित्र असा विवाह संस्कार हा धार्मिक न रहाता व्यवसायाचे माध्यम बनत चालला आहे, हे अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. जनतेला धर्मशिक्षण न दिल्यामुळे ती किती प्रमाणात भ्रष्ट झालेली आहे, याचे उदाहरण आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ‘विवाह संस्कार’ हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. सध्या विवाहाला धार्मिक अधिष्ठान न राहिल्यामुळे कुटुंबसंस्था मोडकळीस येऊन त्यातील घटक असुरक्षित होतांना दिसत आहेत. १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत विवाह पद्धतीला पुष्कळच धार्मिक अधिष्ठान होते. ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी हिंदु धर्मानुसार प्रमुख १६ संस्कार सांगितलेले आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचा ‘विवाहसंस्कार’ ! याचा खरा उद्देश, म्हणजे दोन जिवांचे भावी जीवन एकमेकांना पूरक अन् सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे ! हिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे. असे असतांना केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी असे विवाह संस्काराचे बाजारीकरण थांबायला हवे. यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे आणि बाजारीकरण करणार् यांना तात्काळ कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्रात विवाह संस्कार खर्या अर्थी जपला जाईल, हे नक्की !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव