सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानात किंवा नाडीपट्टीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘संत’ असा न करता ‘विष्णूचा अंशावतार’ असा असण्यामागील कारणे !
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
साधकांना सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानात माझा उल्लेख ‘संत’ असा न करता काही वेळा ‘विष्णूचा अंशावतार’ असा केलेला असतो. सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन करतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन् माझा उल्लेख ‘विष्णूचा अवतार’ असा करतात. त्यांनी साधकांना मला ‘सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले’, असे संबोधण्यास सांगितले आहे. त्याची पुढील कारणे आज माझ्या लक्षात आली.
१. संत त्यांच्या शिष्यांना त्यांच्या संप्रदायानुसार एकच साधना शिकवतात. सनातनमध्ये संप्रदाय नसून प्रत्येकाला त्याच्या आध्यात्मिक स्थितीप्रमाणे निरनिराळी साधना शिकवतात.
२. संत ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांनुसार एखाद्या योगमार्गानुसार शिकवतात, तर सनातनमध्ये ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या सिद्धांतानुसार निरनिराळ्या साधकांना निरनिराळ्या साधना शिकवतात.
३. मी प्रत्येकाला निरनिराळी साधना सांगतांना ती ‘गुरु’ म्हणून सांगत नाही, तर डॉक्टर निरनिराळ्या रुग्णांना निरनिराळी औषधे देतात, त्याप्रमाणे माझ्याकडून निरनिराळी साधना सांगण्यात येते.
४. सनातनमध्ये सर्वांना एकच गुरुमंत्र दिला जात नाही, तर ज्याच्या त्याच्या आवश्यकतेनुसार त्याला मंत्र (नामजप) सांगण्यात येतात, उदा. आध्यात्मिक त्रासाच्या निवारणासाठी आवश्यक त्या देवतेचा जप, प्राणशक्ती कमी असल्यास ती वाढण्यासाठीचा आवश्यक जप, कुंडलिनीचक्रात कुठे अडथळा असल्यास तो दूर करण्यासाठी आवश्यक तो जप सांगण्यात येतो.
५. मी स्वतःला माझ्या गुरूंचा ‘शिष्य’ समजतो. मी साधकांकडे ‘शिष्य’ म्हणून न पहाता ‘साधक’ म्हणून पहातो. त्यामुळेही माझ्या मनात ‘मी गुरुमंत्र दिला’, असा विचार येत नाही. त्यामुळे साधकांच्या मनात माझ्याबद्दल ‘गुरु’ असा विचार न येता ‘मार्गदर्शक’ असा विचार येतो.
६. ‘केवळ साधना सांगण्यापेक्षा तिच्यामागील कारणे, शास्त्र इत्यादी सांगितल्यास साधक ती मनापासून करतील’, असा माझा विश्वास असल्याने मी त्यासंदर्भात साधकांशी बोलतो. अध्यात्मातील केवळ तात्त्विक माहिती साधकांना सांगत नाही.
७. इतर संप्रदायांत त्यांनी सांगितलेली साधना करतांना त्या साधकाला काही ना काही बंधने पाळावी लागतात; मात्र सनातनमध्ये साधना करतांना साधनेविना इतर कोणतीही बंधने सांगितली जात नाहीत.
८. इतर संत त्यांच्या शिष्यांना आशीर्वाद देतात. मी कुणालाही कधीच आशीर्वाद दिलेला नाही; कारण ‘मी काहीच करत नाही, तर ‘सर्व ईश्वरच करतो’, असा भाव माझ्यात असतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.५.२०२२)
पू. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे मुख्य संकलक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. ‘आध्यात्मिक परिभाषेत सांगायचे म्हटले, तर बहुतेक संत किंवा गुरु यांची आध्यात्मिक पातळी सरासरी ७० टक्के असते. त्यापुढे सद्गुरु (आध्यात्मिक पातळी ८० टक्के) आणि परात्पर गुरु (आध्यात्मिक पातळी ९० टक्के) या पायऱ्या आहेत. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची सध्याची आध्यात्मिक पातळी ९५ टक्क्यांपेक्षाही अधिक असून, ते सतत आनंदावस्थेत आणि अधिक काळ निर्गुणावस्थेत असतात. सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना साक्षात् ईश्वर सूक्ष्मातून ज्ञान देतो आणि नाडीपट्टीवाचनाच्या माध्यमातून सनातनला उच्च लोकांतील महर्षि ज्ञान देतात. परात्पर गुरु डॉक्टरांची उच्च कोटीची आध्यात्मिक अवस्था असतांना ईश्वर किंवा महर्षि त्यांना ‘संत’ किंवा ‘गुरु’ म्हणून कसे संबोधतील ? असे करणे म्हणजे, परात्पर गुरु डॉक्टरांच्या आध्यात्मिक स्थितीचे अवमूल्यन करण्यासारखे आहे. यासाठी ईश्वर किंवा महर्षि तसे करत नाहीत.
२. बहुतेक संत किंवा गुरु यांची साधना मूलतः ‘ईश्वरप्राप्ती करून घेणे’, या उद्देशाने आरंभ झालेली असते. पुढे ते एका टप्प्यापर्यंत समष्टी कल्याणाचे कार्यही करतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष १९८७ मध्ये ‘अध्यात्मशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. तेव्हा ते विशेष साधना करत नव्हते आणि त्यांना गुरुप्राप्तीही झालेली नव्हती. असे असतांनाही त्या ग्रंथामध्ये त्यांनी शेवटी ‘दुःखी जिज्ञासू होवोत । होवोत जिज्ञासू मुमुक्षू । मुमुक्षू होवोत साधक । अन् साधक जावोत मोक्षासी ।।’, ही प्रार्थना केली आहे. त्या काळी ते ‘समाजाला अध्यात्म समजावे आणि समाजाने साधना करावी’, यांसाठी अध्यात्माचे अभ्यासवर्गही घेत असत. स्वतः विशेष साधना करत नसतांनाही समष्टी कल्याणाची तीव्र तळमळ त्यांच्यात त्या काळातच होती. समष्टी कल्याणाची उपजत तीव्र तळमळ भगवंताच्या अवतारातच असू शकते. थोडक्यात परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये जन्मतःच ईश्वरी अवतारत्वाचे बीज होते आणि गुरुप्राप्तीनंतर बिजाचे वृक्षात रूपांतर झाले. यासाठी ईश्वर किंवा महर्षि परात्पर गुरु डॉक्टरांना ‘विष्णूचा अवतार’ म्हणून संबोधतात. (वर्ष २०१५ मध्ये झालेल्या सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या वाचनात महर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे घोषित केले आहे.)
३. ‘ज्ञानम् इच्छेत् सदाशिवात् । मोक्षम् इच्छेत् जनार्दनात् ।।’, असे म्हटले आहे. याचा अर्थ असा, ‘शिवापासून ज्ञानाची आणि विष्णूपासून मोक्षाची इच्छा करावी.’
बहुतेक संत किंवा गुरु यांचे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच सत्शिष्य असतात आणि त्यांपैकी अगदी अल्प संतपदाचे अधिकारी असतात. याउलट परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आणि त्यांच्या कृपेने १.५.२०२२ पर्यंत सनातनचे १२१ साधक संत बनले असून, १ सहस्र ३६४ साधक संत बनण्याच्या मार्गावर आहेत. हे सर्व साधक आता जीवन्मुक्त झाले आहेत. थोडक्यात परात्पर गुरु डॉक्टर मोक्षगुरुच आहेत. केवळ ईश्वरी अवतारामध्येच इतक्या जणांना अल्प कालावधीत जीवन्मुक्त करण्याची क्षमता असते. यावरूनही ‘ईश्वर किंवा महर्षि त्यांना ‘विष्णूचा अवतार’ म्हणून का संबोधतात ?’, हे लक्षात येते.
४. आजपर्यंत कोणतेही संत किंवा गुरु यांच्या हातून ‘धर्मसंस्थापना आणि धर्मराज्याची (ईश्वरी राज्याची) स्थापना’, हे महत्कार्य झालेले नाही. केवळ श्रीराम आणि श्रीकृष्ण या श्रीविष्णूच्या अवतारांकडूनच हे कार्य झालेले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्मराज्याच्या) स्थापनेचा उद्घोष केला आहे. धर्माच्या अधिष्ठानावरच हे राष्ट्र उभे रहाणार आहे. यासाठी परात्पर गुरु डॉक्टर ग्रंथलिखाण, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना आदी माध्यमांतून धर्मप्रसाराचे कार्य अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शनाचे कार्य तळमळीने अविरत करत आहेत. नाडीपट्टीवाचनाच्या माध्यमातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे ‘धर्मसंस्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’, हे कार्य परात्पर गुरु डॉक्टरांच्याच हातून होणार आहे. यासाठीच ईश्वर किंवा महर्षि त्यांना ‘विष्णूचा अवतार’ संबोधतात.
५. परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच कलियुगांतर्गत एका छोट्या नव्या सत्ययुगाचा आरंभ होणार आहे. यासाठीच परात्पर गुरु डॉक्टर हे युगपुरुष आहेत ! युगपरिवर्तनाचे कार्य केवळ भगवंताचे अवतारच करू शकतात. यासाठीच ईश्वर किंवा महर्षि त्यांना ‘अवतार’ संबोधतात.’ (१२.५.२०२२)
|