श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याचे महत्त्व
श्रीविष्णूच्या योगमायेला ‘हरिमाया’ असेही म्हटले आहे. श्रीविष्णूची माया त्याच्या भक्तांवर अशी आवरण आणते की, त्या भक्ताला भगवंताच्या मूळ स्वरूपाचे विस्मरण होते. साधक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नाते ‘गुरु-शिष्या’चे आहे. आम्ही सर्व ‘साधक’ या नात्यामध्येच आनंदात रहातो; मात्र आम्हा साधकांना हे कळलेच नाही की, ज्यांचे आपण ‘गुरु’ म्हणून पूजन करतो, ते ‘साक्षात् श्रीविष्णूचे कलियुगातील अवतार’ आहेत. आहे कि नाही, ही ‘श्रीविष्णूची माया’ ? आता आम्हा साधकांना हे कळून चुकले आहे, ‘आमचे गुरु हे श्रीविष्णुच आहेत.’ हीसुद्धा श्रीविष्णूचीच माया आहे. आज श्रीविष्णूच्या या अवतार लीलेविषयी आपण जाणून घेऊया.
१. भगवंताच्या अवतारी लीलेचे महत्त्व
धर्मसंस्थापनेसाठी ईश्वर अवतार धारण करतो. सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर ‘भक्तांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’ यांसाठी भगवंत अवतार धारण करतो. हे अवताराचे मूळ कार्य आहे; पण अवतारी लीलेचे अजून एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे आणि ते म्हणजे अवताराने पृथ्वीवर जन्म घेतल्यावर तो युगानुयुगे भक्तांना भवसागरातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतो. अवतार पृथ्वीवर आल्यामुळे अवतारी लीला घडतात. त्या लीलेतूनच रामायण, महाभारत आणि श्रीमद्भागवत यांसारख्या अजरामर कथा सिद्ध होतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवताराच्या लीलांचे स्मरण, कीर्तन आणि श्रवण केल्याने मनुष्य अल्प कालावधीत संसारातून मुक्त होऊ शकतो. हेच भगवंताच्या अवतारी लीलेचे महत्त्व आहे.
२. अवतारांमुळेच मनुष्य जीवनात आनंद आहे !
भगवंताने मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, मोहिनी, श्रीनिवास (तिरुपति बालाजी) आणि वेदव्यास असे अनेक अवतार धारण केल्याने मनुष्याच्या जीवनाला आनंदाचा स्रोत लाभला अन् मानवी जीवनाला एक ध्येय मिळाले. अवतार नसता, तर मनुष्याच्या जीवनात आनंदच नसता ! आज भारतात श्रीराम आणि श्रीकृष्ण जेथे जेथे गेले, ते ते गाव त्यांच्या आगमनामुळे आपल्या आठवणीत राहिले. मथुरेला गेलो, तर श्रीकृष्णाची आठवण येते आणि अयोध्या म्हटले की, श्रीरामाची आठवण येते. एवढेच नव्हे, तर आपले बंधू-बांधव आणि पूर्वज यांचीही नावे अवताराच्या नावानेच आहेत.
३. अवतारी लीला आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे !
नदी, पर्वत, समुद्र, तलाव, गाव, वृक्ष, दगड हे अवतारी लीलेमुळे जागृत झाले आहेत. अवतारी लीला या आपल्या जीवनाच्या अविभाज्य अंग आहेत. आई मुलांना रामायण आणि महाभारत यांतील कथा सांगते, तर राज्यशास्त्रातील तज्ञ यातूनच धडे घेतात. ‘श्रीकृष्णनीती’ आणि ‘रामराज्य’ हे दोन शब्द अवतारी लीलेमुळेच जन्माला आले आहेत. कृष्णाष्टमी, श्रीरामनवमी, दीपावली, विजयादशमी आदी सणांचा जन्म अवतारी लीलेमुळेच झाला आहे.
४. श्रीविष्णूने कलियुगात घेतलेला अवतार म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले !
काकभुशुण्डिऋषि श्रीविष्णूचे वाहन गरुड याला सांगतात की, हे गरुडा, भगवंत नटवरनागर आहे. ‘नटवरनागर’ म्हणजे एकच नट एखाद्या नाटकामध्ये विविध पात्रे करतो. त्या पात्राचा अभिनय पाहून प्रेक्षक प्रभावित होतात; पण नट अप्रभावित असतो. कुणी नाटक बघो किंवा न बघो, पात्रधारी नाटकात अभिनय करून निघून जातो. नंतर लोक त्या पात्राशी स्वतःची तुलना करतात, त्या पात्राविषयी चर्चा करतात आणि त्या पात्राशी एकरूप होतात. प.पू. डॉक्टर, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे सध्याच्या अवतारी लीलेतील अवताराचे नाव आहे. सनातनचे सर्व साधक या अवतारी लीलेचे साक्षीदार आहेत. श्रीविष्णूने कलियुगातील सनातनच्या साधकांसाठी घेतलेला अवतार म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले होय ! आणि म्हणूनच परात्पर गुरु डॉ. आठवले हेही ‘नटवरनागर’ आहेत.
५. ‘आपण ज्याला भेटलो, बोललो आणि ज्याच्या समवेत सेवा केली, तो वैकुंठातून आलेला साक्षात् श्रीविष्णु होता’, हे कळायला थोडा वेळ जाईल !
येणाऱ्या काळात सर्व साधक आणि समाज श्रीविष्णूच्या या अवताराशी, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले (गुरुदेवांशी) यांच्याशी स्वतःची ओळख सांगतील, गुरुदेवांच्या कार्याविषयी बोलतील आणि त्यांच्या आठवणी सांगतील; मात्र ‘आपण ज्याला प्रत्यक्ष भेटलो, ज्याच्याशी बोललो, ज्याच्या समवेत जेवलो, सेवा अन् प्रवास केला, तो वैकुंठातून आलेला साक्षात् भगवान श्रीविष्णु होता’, हे सगळ्यांना कळायला थोडा वेळ लागेल ! एक गोष्ट नित्य आणि सत्य आहे, ती म्हणजे ‘भगवंताचे नाटक म्हणजे मुक्तीचा मार्ग’ !
– श्री. विनायक शानभाग, (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) चेन्नई. (११.५.२०२२)