लहान-लहान कृतींतही साधकांचाच विचार करून त्यांची सर्वतोपरी काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. साधकांच्या समवेत जेवणे !
पूर्वी सुखसागर (गोवा) येथे असतांना परात्पर गुरु डॉक्टर खोलीत न जेवता १४ – १५ पायऱ्या चढून भोजनकक्षातच जेवायला यायचे. त्या वेळी आम्ही मुली जेवण ठेवून झाल्यावर त्यांना बोलवायला जायचो. ते इतरांच्या आधी जेवणही घेत नसत. साधकांच्या समवेतच घेत असत. उद्देश हा की, साधकांच्या आधी न जेवता एकत्रच जेवूया. क्वचित् कधी साधकांच्या जेवणाला विलंब होणार असेल, तर ते म्हणायचे, ‘‘थांबूया १० मिनिटे ! एक दिवस विलंब झाला, तर काय झाले ?’’ त्यांच्या या बोलण्यामुळे साधिकांच्या मनावरील ताण निघून जायचा. ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक क्षणी साधकांसाठी किती करतात आणि त्यांना कसा आधार देतात’, हेच शिकायला मिळाले.
२. साधिकेच्या शस्त्रकर्माची सर्व व्यवस्था आश्रमातूनच करण्यास सांगणे !
मागे एकदा माझी बहीण कु. अंजली चौधरी (आताच्या सौ. मुक्ती तांबे) हिला आध्यात्मिक आणि शारीरिक त्रास होत होता. ‘अपेंडिक्स’च्या त्रासासाठी शस्त्रकर्म करण्याचाही पर्याय दिला होता. परात्पर गुरु डॉक्टरांनी तिच्यासाठी नामजपादी उपायही चालू केले. त्यानंतर भाऊ तिचे शस्त्रकर्म करून घेणार होता. याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगायला गेल्यावर ते म्हणाले, ‘‘भाऊ व्यवस्था का करणार आहे ? त्याला सांग, ‘अंजली आमची साधिका आहे. त्यामुळे तिचे सर्व आम्हीच करू.’’ त्यांच्या वरील बोलण्याने ‘परात्पर गुरु डॉक्टर आम्हा पामरांसाठी किती करतात’, या जाणिवेने भरून आले. गोव्यातील रुग्णालयातील ओळखीच्या आधुनिक वैद्यांशी मी बोलून घेतले आणि त्यानंतर अंजली त्या रुग्णालयात भरती झाली. त्याच दिवशी तिचे शस्त्रकर्म झाले. तिला कोणताही त्रास झाला नाही. साधकांचे प्रेम आणि गुरूंची सर्वज्ञता अन् प्रीती अनुभवता आली.
|