सूक्ष्मस्तरावर कार्य करणारे एकमेवाद्वितीय !
संपादकीय
‘जेव्हा जेव्हा अधर्म बळावतो, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो आणि धर्माची पुनर्स्थापना करतो’, असे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. भगवान श्रीकृष्णाचे पूर्ण चरित्र पाहिल्यास त्यात विविध गोष्टी अंतर्भूत आहेत. त्यात नवविधा भक्ती आहे, तसेच क्षात्रधर्म आहे. त्यामुळे जेव्हा धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणाचा विषय येतो, तेव्हा अन्य कोणत्याही अवतारापेक्षा भगवान श्रीकृष्णाचीच अधिक आठवण येते अन् त्याचाच आदर्श घेऊन प्रत्येकाला कार्य करावेसे वाटते. भगवान श्रीकृष्ण यासाठीचा स्फूर्तीदाता आणि विचारप्रवर्तक आहे. आर्य चाणक्य यांनी नंदकुळाचा नाश केल्यानंतर भारत एका छत्राखाली आणला. त्यासाठी त्यांनी कृष्णनीतीचाच अधिक वापर केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याद्वारे ५ पातशाह्यांना जेरीस आणून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. यामागे श्रीकृष्णनीतीच होती. याच प्रेरणेने पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी क्रांतीज्योत पेटवली. या सर्वांनी कृष्णनीतीचा आदर्श घेतला; पण समजा आताच्या परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच कार्य करत असल्यास ते कार्य कसे असेल ?, याची कल्पना कुणाला करता येईल का ? तर त्याचे उत्तर बहुतांश ‘नाहीच’ असे म्हणता येईल; कारण ‘असे काही घडू शकते’, असा विश्वास साधू, संत, उन्नत आणि साधक यांच्या व्यतिरिक्त कुणी करू शकत नाही. ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे नाडीपट्टीमध्ये महर्षि सांगत आहेत. सनातनच्या साधकांची यावर श्रद्धा आहे, तसेच त्यांचा भावही आहे.
सूक्ष्मस्तरावरील युद्धाचा परिणाम !
परात्पर गुरु डॉ. आठवले आध्यात्मिक स्तरावर (सूक्ष्मस्तरावर) अधर्मावर विजय मिळवून धर्माची स्थापना करण्याचे कार्य गेली २३ वर्षे करत आहेत. परात्पर डॉ. आठवले यांनी वर्ष १९९८ मध्येच ‘वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार’, असे सांगितले होते. यातील बहुतांश कार्य हे आध्यात्मिक स्तरावर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. असे यापूर्वी कुणीही सांगितलेले नव्हते. आज देशात जी काही हिंदुत्वाची लाट आली आहे, त्याच्या मागे ईश्वरी नियोजन आहे. २५ ते ३० वर्षांपूर्वी विदेशातील नव्हे, तर भारतातील हिंदूंना स्वतःला ‘हिंदु’ म्हणायलाही लाज वाटत होती. आजची स्थिती कितीतरी वेगळी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्या वेळी ‘हिंदु धर्माच्या नावावर निवडणुका जिंकू शकतो’, असा विचारच करता येत नव्हता. नुकतीच झालेली उत्तरप्रदेशातील विधानसभेची निवडणूक संपूर्णपणे हिंदुत्वाच्या सूत्रावर लढली गेली आणि जिंकली गेली. अयोध्या, मथुरा आणि काशी यांच्या मुक्तीची घोषणा गेली अनेक शतके, दशके चालू होती. त्यांतील अयोध्या मुक्त झाली आणि मथुरा अन् काशी काही काळातच मुक्त होण्याची स्थिती आहे. आता भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याचा विचार सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचे म्हटले जात आहे. ‘हे इतक्या वर्षांत अचानक कसे काय झाले ?’, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर विचार करणे आवश्यक आहे. तसा भाव असणेही महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक स्तरावर कार्य करतांना संत, गुरु यांची संकल्पशक्ती आणि सूक्ष्मस्तरावर कार्य करण्याची शक्ती महत्त्वाची असते. पूर्वीचे क्रांतीकारक आणि नंतर साधना करून ‘योगी’ झालेले योगी अरविंद यांनी दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा पराभव होण्यासाठी सूक्ष्मस्तरावर युद्ध केले होते. म्हणजे हिटलरला सूक्ष्म रूपाने साहाय्य करणाऱ्या शक्तींशी योगी अरविंद यांनी सूक्ष्मस्तरावर युद्ध करून त्यांना शक्तीहीन केले आणि त्याचा परिणाम हिटलरच्या पराजयात झाला. याची माहिती त्यांच्या पुस्तकात देण्यात आली आहे. भगवान श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुनाला गीता सांगतांना म्हटले, ‘‘मी कौरवांना (अधर्मियांना) ठार केलेले आहे, तू केवळ निमित्त हो.’’ याचा अर्थ ‘सूक्ष्मस्तरावर कौरवांना मिळणारी शक्ती नष्ट केली असून आता ते शक्तीहीन झाले आहेत. आता त्यांना केवळ स्थूल रूपानेच नष्ट करणे शेष राहिले आहे आणि ते कार्य तू कर’, असे सांगितले होते. त्याचप्रमाणे सध्या जो काही समाजात अधर्म पसरला आहे, त्यामागे असणाऱ्या सूक्ष्मशक्तींच्या विरोधात परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मस्तरावर युद्ध करत असल्याने सूक्ष्मशक्तींचा मोठ्या प्रमाणात पराजय होऊ लागला असून आपसूकच स्थूल स्तरावर म्हणजे भारतात आणि जगभरात हिंदु धर्माला काही प्रमाणात चांगले दिवस येत असल्याचे दिसत आहे. जसजसा या शक्तींचा पराजय होत जाईल, तसतशी हिंदु धर्मांची पताका जगभरात अधिक तेजाने फडकेल आणि शेवटी भारत पुन्हा एकदा विश्वगुरु पदावर आरूढ होईल.
साधनेद्वारेच हिंदु धर्माचे कार्य करणे शक्य !
योगी अरविंद यांच्या सूक्ष्मस्तरावरील कार्याला कोणतीही प्रसिद्धी मिळालेली नाही किंवा ‘असे काही घडू शकते’, असेही कुणी मान्य करणार नाही; कारण असे काही शास्त्र असते आणि त्याद्वारे स्थूल स्तरावर पालट घडवून आणता येऊ शकतो, याचा कुणाचा अभ्यास नाही किंवा याविषयीचे ज्ञान सध्या प्रचलितही नाही; मात्र जे आध्यात्मिक स्तरावर उन्नत आहेत, त्यांनाच ही गोष्ट ठाऊक आहे अन् ते ईश्वरी इच्छेनुसार कार्य करत असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संपूर्ण कार्यापैकी बहुतांश भाग हा आध्यात्मिक स्तरावरच आहे. उर्वरित भागांमध्ये ग्रंथलिखाण, मार्गदर्शन आदींचा समावेश आहे. जे ग्रंथलिखाण करण्यात आले आहे, त्यातही बराचसा भाग सूक्ष्मस्तरावरील आहे. मन, बुद्धी, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेद्रिये यांच्या पलीकडची गोष्ट समजणे म्हणजे सूक्ष्म जाणणे होय. भावी पिढीला याचा अभ्यास करून हे शास्त्र समजून घेता येईल, याचसाठी त्यांनी त्यांचे लिखाण वैज्ञानिक भाषेत केले आहे. असे लिखाण कुणाकडून झालेले नाही, हे विशेष ! या सूक्ष्मज्ञानाचा अभ्यास करून आणि त्यासाठी आवश्यक असलेली साधना करून जगाच्या, तसेच हिंदु धर्माच्या कल्याणासाठी प्रत्येक जिवाकडून कार्य व्हावे, हीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या चरणी प्रार्थना !
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |