सप्तर्षींनी वर्णिलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महिमा आणि महर्षींच्या कृपेमुळे साधकांना गुरुमाऊलीच्या अवतारत्वाची येत असलेली प्रचीती !
१. सप्तर्षींनी वर्णिलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महिमा !
‘सप्तर्षी म्हणतात, ‘साक्षात् भगवान श्रीविष्णूने मनुष्याला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवण्यासाठीच पृथ्वीवर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’ यांच्या रूपात अवतार धारण केला आहे. प.पू. गुरुदेव साक्षात् ईश्वरच आहेत. ते भगवंताचा अवतार आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडनायक असलेला श्रीमन्नारायण म्हणजे प.पू. गुरुदेवच आहेत. प.पू. गुरुदेव हे सत्यपुरुष आहेत. श्रीविष्णूत असलेली तारक आणि मारक ही दोन्ही तत्त्वे परात्पर गुरुदेवांमध्ये, म्हणजे श्री जयंतावतारात आहेत.’
२. महर्षींच्या कृपेमुळे साधकांना ‘प.पू. गुरुमाऊली, म्हणजे श्रीविष्णूचा अवतार आहे’, याची अनुभूती घेता येणे !
परात्पर गुरुदेव साक्षात् श्रीविष्णुस्वरूप आहेत. वैकुंठलोकात रहाणाऱ्या त्या श्रीविष्णूने अयोध्येत दशरथ राजाच्या घरी ‘श्रीराम’ म्हणून जन्म घेतला, तसेच मथुरेत ‘श्रीकृष्ण’ म्हणून जन्म घेतला. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या काळात ‘ते अवतार आहेत’, याची सर्वांना जाण नव्हती; पण आज महर्षींच्या अगाध कृपेमुळे ‘आपली प.पू. गुरुमाऊली, म्हणजे श्रीविष्णूचा अवतार आहे’, याची अनुभूती आपण घेऊ शकत आहोत.
३. ‘महाविष्णुस्वरूप गुरुदेवांची महती जाणणे’, साधकांच्या बुद्धीपलीकडचे असणे !
परात्पर गुरूंचे दिव्य कार्य आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत आहोत. त्यांना मानवी देहात पाहून आपण कधी कधी हे विसरतो की, आपण ज्यांना मानवी देहधारी रूपात प्रत्यक्ष पहात आहोत, भेटत आहोत किंवा ज्यांचे छायाचित्र आपण पहात आहोत, ते तर साक्षात् महाविष्णुस्वरूप आहेत. ‘महान गुरूंना जाणणे, म्हणजे ‘ते कोण आहेत ? त्यांचे मूळ स्वरूप काय आहे ?’, हे समजणे’, हे साधकांच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे. गुरुरायांची महती आपण आपल्या अल्प मतीने जाणूच शकत नाही. आतापर्यंत अनेक अनुभूती येऊनही आपण ते अंशमात्रही जाणू शकलो नाही. अनंत कोटी ब्रह्मांडांमधील प्रत्येक जिवाकडे समान लक्ष ठेवणाऱ्या आणि त्या प्रत्येकाचे प्रीतीने पालनपोषण करणाऱ्या महाविष्णूची लीला कोण जाणू शकेल ?
४. ‘आपली हाक गुरुमाऊलीपर्यंत पोचते’, याची साधकांना प्रचीती येणे !
सनातनच्या प्रत्येक साधकाला ज्यांच्याविषयी अत्यंत जवळीक आणि आदर वाटतो, ज्यांची आपण अपार भक्ती केलेली आहे, ते म्हणजे एकमेवाद्वितीय असलेले आपले प.पू. गुरुदेव ! त्यांना साधक ‘परम पूज्य, प.पू. डॉक्टर, गुरुदेव किंवा गुरुमाऊली’, असे संबोधतात; परंतु ‘प्रत्येकाची हाक त्या गुरुमाऊलीपर्यंत पोचते’, याची प्रचीती ते आपल्याला नेहमी देत असतात.
साधकांनो, अशा या गुरुमाऊलीचा महिमा आपल्या अंतरंगावर कोरून सतत त्यांच्या चरणी कृतज्ञ रहा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१४.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |