रस्ता खचल्याने यमुनोत्री महामार्ग बंद झाल्याने सहस्रो यात्रेकरू अडकले
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील स्यानाचट्टी आणि रणचट्टी यांमधील रस्ता खचल्याने यमुनोत्री महामार्ग २० मेच्या सायंकाळपासून मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे यमुनोत्री परिसरात सहस्रो यात्रेकरू अडकले. यमुनोत्री मंदिराकडे जाणार्या महामार्गाची सुरक्षा भिंत कोसळल्याने रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली असून सुमारे १० सहस्र लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. रस्ता पुन्हा खुला होण्यासाठी ३ दिवस लागू शकतात. जिल्हा प्रशासन काही छोट्या वाहनांमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र मोठ्या वाहनांमध्ये दूरवरून आलेल्या लोकांना बाहेर पडता आलेले नाही.