‘हिंदु धर्मातील प्रत्येक विधीतील शास्त्र जाणून घेणे’, ही एक साधनाच आहे ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
१. ब्राह्मणाच्या तळहातावर अग्नि असल्याने त्याच्या तळहातावर दक्षिणा देणे, म्हणजे एक प्रकारे अग्नीचा सन्मान केल्यासारखेच असणे
‘एकदा माझे वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी यांच्याशी भ्रमणभाषवर बोलणे झाले. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘ब्राह्मणाच्या तळहातावर अग्नि असतो. त्यामुळे त्यांच्या तळहातावर दक्षिणा देण्याचे महत्त्व पुष्कळ आहे.’’ तेव्हा माझ्या मनात विचार आले, ‘आपण ब्राह्मणाला दक्षिणा देतांना एक प्रकारे त्याच्या तळहातावरील अग्नीलाच ती देत असतो. ही क्रिया म्हणजे एक प्रकारचे अग्निसमर्पण आणि अग्निकर्मच आहे. अग्निनारायणच ही दक्षिणा स्वीकारतो. हा एक प्रकारे अग्नीचा सन्मान केल्यासारखेच आहे.
२. दक्षिणा देतांना आणि घेतांना अकर्म कर्म होण्यासाठी दक्षिणा देणार्या व्यक्तीने, तसेच ती स्वीकारणार्या ब्राह्मणाने ठेवायचा भाव !
ही दक्षिणा अग्नीलाच दिल्याने आपले कर्म अकर्म होते. यामुळे दक्षिणा देणार्यालाही अहं होत नाही की, मी दक्षिणा दिली आणि ती स्वीकारणार्यालाही अहं होत नाही की, मलाच ती मिळाली; परंतु येथे अग्नीप्रती भाव मात्र हवा. दक्षिणा देतांना ‘ही दक्षिणा मी प्रत्यक्ष अग्निनारायणालाच देत आहे’, असा यजमानाचा भाव हवा. ती स्वीकारणार्या ब्राह्मणाच्या मनातही कोणताही किंतु न येता ‘ही दक्षिणा केवळ अग्नीलाच समर्पित झाली आहे. मी केवळ माध्यम आहे’, असा भाव हवा, तरच दक्षिणा देणार्याला आणि ती घेणार्या ब्राह्मणाला याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन देवाण-घेवाण हिशोब निर्माण होणार नाही.
३. हिंदु धर्मातील प्रत्येक विधीमागे मोठे आध्यात्मिक शास्त्र असणे
‘हिंदु धर्मातील प्रत्येक विधीमागे आध्यात्मिक शास्त्र केवढ्या मोठ्या प्रमाणात दडले आहे’, हेच यातून लक्षात येते. केवळ आपल्यात हे शास्त्र जाणून घेण्याची जिज्ञासा हवी, तरच प्रत्येक कृतीमागील अर्थ कळून त्या विधीतील देवत्व आपल्याला कळेल. ही एक प्रकारची साधनाच आहे. ‘हिंदु धर्मातील शास्त्राचा प्रसार आपल्याला अखिल जगतात करायचा आहे’, हेच परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हा साधकांना शिकवत आहेत.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१८.१.२०२१, सकाळी ६.४१)