श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेले भूलोकातील कैलास असलेल्या कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीचे दर्शन !
१. महर्षींनी भूलोकातील कैलास असलेल्या कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीचे दर्शन घेण्यास सांगणे
८.२.२०२१ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी १६९ क्रमांकाचे नाडीवाचन केले. या नाडीवाचनात महर्षींनी सांगितले, ‘तुम्ही या दिवसांत कधीही कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीच्या दर्शनाला जाऊन या. कांचीपूरम् हे भूलोकातील कैलास आहे.’ आपत्काळात रक्षण होण्यासाठीही महर्षी साधकांना चेन्नई सोडून कांचीपूरम्ला जाण्यासाठी सांगत आहेत.
२. ‘कांचीपूरम्’ नगरीचे माहात्म्य !
कांचीपूरम् ही नगरी सप्तपुरींपैकी एक आहे. येथे तमिळनाडूतील पंचतत्त्वांच्या शिवांपैकी ‘एकांबरेश्वर’ हे पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असलेल्या शिवाचे मंदिर आहे, तसेच येथे विष्णूच्या १०८ दिव्य क्षेत्रांपैकी एक असलेले ‘वरदराज पेरुमल’ हे मंदिर आहे. तमिळ भाषेत ‘पेरुमल’ म्हणजे ‘विष्णु.’ येथे आद्य शंकराचार्य स्थापित कांचीमठही आहे. अनेक चैतन्यमय मंदिरांच्या सहवासात हे गाव वसलेले आहे.
३. देवीच्या सगुण रूपाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती
३ अ. मंदिराच्या आवारात बसल्यावर देवीच्या गर्भगृहातून वीणेचे स्वर सूक्ष्मातून ऐकू येणे, या नादातून ‘देवी सरस्वतीतत्त्व देत आहे’, असे वाटणे, हा नाद सर्वांपर्यंत पोचून सर्वांना चैतन्य मिळण्यासाठी प्रार्थना करणे आणि मनात ‘हा नाद सर्व ब्रह्मांडाला व्यापत आहे’, असा भाव निर्माण होणे : आम्ही कांची कामाक्षीचे दर्शन घेण्यासाठी दुपारी निघालो आणि ३.३० वाजता मंदिरात पोचलो. ‘अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून साधकांचे रक्षण व्हावे आणि गुरुदेवांना उत्तम आरोग्य लाभावे’, यासाठी आम्ही दुपारी ४ वाजता देवीला अभिषेक करणार होतो. कांचीपूरम्चे मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिराचा परिसरही पुष्कळ मोठा आहे.
तेथील कर्मचार्यांनी आम्हाला मंदिराच्या आवारात बसण्यास सांगितले. मी तेथे बसून देवीला सनातनच्या कार्याविषयी सर्व सांगत होते. सनातनवर येत असलेल्या संकटांविषयीही मी तिच्याशी बोलत होते. एवढ्यात मला जाणवले, ‘देवीच्या गर्भगृहातून वीणेचे स्वर ऐकू येत आहेत.’ हळूहळू हे स्वर संपूर्ण मंदिरात पसरले आणि सर्व मंदिर वीणेच्या स्वरांनी भारून गेले. ते ऐकून माझ्या अंगावर रोमांच येऊ लागले. आधी मी सगळीकडे पाहिले की, जवळ कुणी वीणा वाजवत नाही ना ?; परंतु ती एक सूक्ष्म नादाची अनुभूती होती. ‘देवी मला वीणेच्या नादातून सरस्वतीतत्त्व देत आहे’, असे वाटले. माझे मन या नादाने प्रसन्न झाले. मी देवीला म्हटले, ‘हे जगदंबे, हा वीणेचा नाद आमचे साधक, आश्रम, सर्व संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या कानापर्यंत पोचून त्यांना त्यातून चैतन्य मिळू दे.’ त्यानंतर हा नाद हळूहळू पसरत सर्व ब्रह्मांडाला व्यापत असल्याचा भाव माझ्या मनात निर्माण झाला. त्या वेळी माझे मन पूर्णतः निर्विचार झाले.
३ आ. देवीला अभिषेक करत असतांना ‘स्वतःवरच अभिषेक होत असून देवीची मूर्ती स्वतःच्या हृदयात आहे’, असे जाणवणे : काही वेळाने आम्हाला मंदिरात बोलावले आणि अगदी देवीच्या गर्भगृहासमोर बसवले. कांची कामाक्षीची स्वयंभू मूर्ती अतिशय सुंदर दिसत होती. तिच्यावर अभिषेक होत असतांना ‘हा अभिषेक माझ्यावरच होत आहे आणि देवीची मूर्ती माझ्याच हृदयात आहे’, असे मला वाटू लागले. त्या वेळी ‘माझ्या डोक्यातील कणाकणांतील ज्ञानशक्तीची केंद्रे जागृत होत आहेत’, असे मला जाणवत होते. देवीच्या अभिषेकासाठी ऊसाचा रस, शहाळ्याचे पाणी, गंध, जल आणि फळांचा रस उपयोगात आणला गेला.
३ इ. वस्त्रालंकार धारण केलेल्या देवीचे दर्शन घेतल्यावर तिच्या हातात चांदीची वीणा दिसल्याने पुष्कळ आश्चर्य वाटणे : अभिषेकानंतर देवीला अलंकार घातले गेले. देवीला वस्त्र नेसवत असतांना गर्भगृह थोडा वेळ बंद करतात. देवीने वस्त्रालंकार धारण केल्यानंतर गर्भगृहाचा पडदा सरकवला गेला आणि मला पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण देवी हातात चांदीची वीणा घेऊन बसली होती. तिने पोपटी रंगाची साडी नेसली होती. मी सकाळी ‘देवीचे दर्शन घ्यायला जातांना अशीच पोपटी रंगाची साडी नेसूया’, असे मनात ठरवले होते; परंतु काही कारणाने ते राहिले. तो विचार देवीचाच होता. देवीच्या आणि माझ्या साडीत कमालीचे साम्य होते. तिने वीणेचा नाद ऐकवून आधीच मला तिच्या सगुण रूपाच्या अस्तित्वाची अनुभूती दिली होती.
४. देवळाच्या प्रांगणातच ओळखीचे बांधकाम कंत्राटदार आणि साधक भेटणे अन् त्यांच्या समवेत जागा पहायला जाणे
तेथे रहाणारे एक ओळखीचे बांधकाम कंत्राटदार आम्हाला तेथील काही भूमी दाखवण्यासाठी घेऊन जाणार होते. ते आम्हाला देवळातच भेटले. चेन्नईच्या साधकांना आपत्काळात रहाण्यासाठी काही जागा पहायच्या होत्या; म्हणून काही साधकही मंदिरात आले होते. आम्ही हे सर्व आधीच नियोजन करून ठेवले होते. देवीचा आशीर्वाद घेऊन सर्व जण मंदिरातून बाहेर पडलो. आम्ही या बांधकाम कंत्राटदाराला आमचे कार्य सांगितले. ते आमच्या कार्याने पुष्कळ प्रभावित झाले. मला वाटले, ‘ही व्यक्ती आपल्याला आपत्काळात उपयोगी पडेल’, त्यामुळे देवीने या मंदिराच्या प्रांगणात आमच्याशी तिची भेट घालून दिली आहे. तेथील काही जागा पाहून आम्ही चेन्नईला परत आलो.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१०.२.२०२१, सकाळी ८.०९)
|