कॅथॉलिकांची देणगी – दारूचे व्यसन
हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…
गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी एक डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. २० मे या दिवशी आपण ‘गोव्याच्या संस्कृतीची पोर्तुगिजांनी केलेली हानीे’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील अंतिम भाग येथे देत आहोत.
आमच्या राष्ट्रीयत्वाचा र्हास सिद्ध करणारे आणखी एक उदाहरण म्हणजे आमची मद्यपानातील भयानक प्रगती ! या शारीरिक आणि नैतिक अधःपतनात कॅथॉलिक लोकच अग्रणी आहेत. त्यांनी आपल्या उदाहरणाने हिंदूंनासुद्धा भ्रष्ट केले आहे. हिंदु किंवा मुसलमान धर्म या विषारी दुर्गुणाचा प्रसार करण्यावर निर्बंध घालत, हे जगजाहीर आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये मद्यपानाला मज्जाव नसल्याचा लाभ आमच्या पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी घेतला आणि मुद्दाम दुष्ट वृत्तीने स्थानिक दारूचे बेसुमार उत्पादन आणि खप वाढवला. तसेच विदेशी मद्यालासुद्धा स्वतःला धनवान बनवण्यासाठी उत्तेजन दिले. खरे तर ख्रिस्तीकरणाचे धोरण आणि मद्यपानाला लाभदायी उत्तेजन हे दोन्ही हातात हात घालून पुढे जात होते. मद्यापायी मिळणारे उत्पन्न काही वर्षांपूर्वी देशाच्या सर्व उत्पन्नाच्या १/५ का १/४ इतके झाले. त्याचबरोबर मद्य आणि दारूची आयात करायला पाठिंबा दिला गेला; कारण पोर्तुगिजांकडून मुख्यतः त्याचीच निर्यात होत असते. परिणामी धार्मिक समारंभ, प्रार्थना, बाप्टीझम, लग्नकार्ये इतकेच नव्हे, तर प्रेतयात्रा हे प्रसंग अनिर्बंध मद्यपानाचे प्रसंग बनले आहेत आणि या सगळ्याला कॅथॉलिक धर्माच्या सत्ताधिकार्यांची अलिखित संमती असते. काहीशी बंधने आणि बिशपकडून निघालेले धर्मादेश प्रतिकूल सार्वजनिक मतामुळे काढण्यात आले असले, तरी मुद्दामच ते कार्यान्वित केले जात नाहीत. या अघोरी धोरणामुळेच गोवा हा जगातल्या सर्वांत जास्त मद्यपी देशांपैकी एक बनला आहे आणि लंडनमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत तसा त्याचा उल्लेखही करण्यात आला. आपल्या वंशाचे शारीरिक अधःपतन आणि मानसिक उदासीनता याला तेच उत्तरदायी आहेत, गोवेकर ज्या ‘व्हिस्की आणि सोडा’ आणि ‘व्हाईट वाईन ऑफ मास’ छाप संस्कृतीत निपुण झाले आहेत, तिची एवढीच जमेची बाजू !’ – (पृष्ठ क्र. ५८)
(समाप्त)
(लेखातील दिलेले पृष्ठ क्रमांक ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्हास’ या पुस्तकातील आहेत. इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)