सोलापूर जिल्ह्यातील १७८ गावांसाठी १६२ कोटी ४७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रीया पूर्ण ! – दी.ह. कोळी, मुख्य कार्यकारी अभियंता, सोलापूर
सोलापूर, २० मे (वार्ता.) – ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ४० लिटर प्रतिमाणसी/ प्रतिदिवस असलेल्या पाणी योजनेचे विस्तारीकरण करत प्रतिमाणसी ५५ लिटर करण्याचे उद्दिष्ट ठेवत १७८ गावांसाठी १६२ कोटी ४७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्या आहेत. लवकरच जिल्हा परिषदेच्या वतीने त्या प्रसिद्ध करण्यात येतील. यात अक्कलकोट ३७, बार्शी १९, करमाळा १०, माढा १४, माळशिरस १४, मोहोळ १८, पंढरपूर ५, सांगोला ३०, मंगळवेढा तालुक्यातील ११ गावांचा समावेश असून उत्तर सोलापूर ७ आणि दक्षिण सोलापूर मधील १३ गावांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषद येथील मुख्य कार्यकारी अभियंता दी.ह. कोळी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’शी बोलतांना दिली.
कार्यकारी अभियंता पुढे म्हणाले, ‘‘यातील काही योजना नवीन आहेत, तर काही योजनांची क्षमता वाढवण्यात येणार आहे. या योजनांसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी संबंधित गावातील विहिरी हेच मुख्य पाण्याचे क्षेत्र म्हणून कार्यरत असणार आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणचे पिण्याचे पाणी हे स्वच्छ असणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वर्ष २०२४ पर्यंत ‘देशातील प्रत्येक गावात पाणी’ या पंतप्रधानांच्या योजनेनुसार हे काम गतीने चालू आहे. गेले काही अनुभव पहाता आम्ही पाणीटंचाईसाठी ११ कोटी रुपयांचा टँकर आराखडा सिद्ध केला होता; मात्र त्याची यंदा आवश्यकता पडली नाही.’’