पुणे येथील ऐतिहासिक लाल महालमध्ये झालेल्या लावणी नृत्याचे चलचित्र प्रसारित !
चलचित्र मुद्रण आणि प्रसारण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईसाठी ‘राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद’कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पुणे – येथील ऐतिहासिक लाल महालमध्ये लावणी नृत्य करून सामाजिक माध्यमावर चलचित्र प्रसारित करण्यात आले आहे. याविषयी शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे. चलचित्र मुद्रण आणि प्रसारण करणाऱ्यांच्या विरोधात ‘राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद’कडून १९ मे या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. ‘लाल महाल’ ही वास्तू महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखाली आहे. सदर वास्तूचे पावित्र्य राखून तिचे जतन करण्याचे शासनाचे आदेश असतांना तिथे केदार अवसरे नावाच्या व्यक्तीने अवैधपणे वैष्णवी पाटील हिचे लावणी नृत्य मुद्रण केले आहे. याविषयीची पोस्ट सामाजिक माध्यमावर कुलदीप बापट नावाच्या व्यक्तीने प्रसारित केली आहे. लाल महालमध्ये अवैधपणे लावणी नृत्याचा कार्यक्रम करून छत्रपती शिवाजी महाराजांची अपकीर्ती केल्याविषयी आरोपींची सखोल चौकशी होऊन त्यांना शिक्षा करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाची चेतावणीही या निवेदनातून देण्यात आली आहे.
केतकी चितळे यांनी केलेल्या टीकेवर त्वरित कारवाई होते; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर त्वरित कारवाई का होत नाही ? असा प्रश्नही शिवप्रेमींकडून सामाजिक माध्यमांवर विचारला जात आहे. (मुळात महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या वास्तूत असे कार्यक्रम करण्यास अनुमती मिळतेच कशी ? याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणे अपेक्षित आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकाशाहिस्तेखानास धूळ चारून इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी याच लाल महालात केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण लाल महालातच गेले. अशा पवित्र ठिकाणी शृंगारिक नृत्याद्वारे अंगविक्षेप करून लावणी सादर करणे हे संतापजनक आहे ! |