इस्रोची गगनभरारी !
संपादकीय
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) फेब्रुवारीमध्ये‘अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट’ म्हणजेच ‘पृथ्वी निरीक्षण उपग्रह’, तसेच ‘इस्रो’चे अन्य २ उपग्रह यांचे यशस्वी प्रक्षेपण केले. यामुळे कृषी, वनीकरण, जलविज्ञान यांसाठी त्याचा उपयोग होत आहे. त्यातीलच एक पुढचा टप्पा म्हणजे भारताचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘गगनयान’ची संकल्पना यशस्वी करण्यासाठी ‘इस्रो’ने नुकतेच ‘ह्यूमन रेटेड सॉलिड रॉकेट बूस्टर’चे यशस्वी परीक्षण केले. यामुळे मनुष्याला अंतराळात दीर्घकाळ रहाणे शक्य होणार आहे.
गेल्या २ वर्षांत ‘इस्रो’ समवेत ५५ पेक्षा अधिक ‘स्टार्टअप’ जोडले गेले असून भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या वर्षी ७५ विद्यार्थ्यांचे ‘सॅटेलाईट’ अंतराळात पाठवण्याचे नियोजन करत आहेत. यापूर्वी ‘इस्रो’समवेत बाहेरील अन्य कुणी स्वतंत्ररित्या काम करण्यास अनुमती नव्हती; मात्र ५५ ‘स्टार्टअप’मुळे ‘इस्रो’च्या विस्तारीकरणास बळ मिळणार आहे. या ५५ स्टार्टअपपैकी २९ उपग्रह, १० स्पेस ॲप्लिकेशन अँण्ड प्रॉडक्ट आणि ८ अंतराळात पाठवण्यात येणाऱ्या रॉकेटशी संबंधित आहेत. या गोष्टींमुळे भारताचा जागतिक पातळीवर दबदबा निर्माण होत आहे. पुढील काळात अनेक देशांचा अवकाश तंत्रज्ञानात नवनवे प्रयोग करण्याकडे कल आहे. त्यामुळे इस्रोची या क्षेत्रातील गगनभरारी भारतियांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.