सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या देखाव्याला उत्कृष्ट पारितोषिक प्राप्त !
|
अमरावती, १९ मे (वार्ता.) – शहरात ‘अखिल भारत ब्राह्मण महासंघा’कडून परशुराम जयंतीनिमित्त ३ मे या दिवशी शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीने स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके, तसेच सनातन संस्थेचा बालसाधक कक्ष असे देखावे करण्यात आले होते. या दोन्हींना मिळून ‘उत्कृष्ट देखावा’ असे पारितोषिक देण्यात आले आहे. या वेळी सनातन संस्थेची बालसाधिका कु. गिरिजा टवलारे (वय ९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) तेथे उपस्थित असल्याने आयोजकांनी सर्वांच्या वतीने तिचा यानिमित्त सत्कार करून रोख रकमेची भेट दिली. या वेळी सनातन संस्थेच्या श्रीमती विभा चौधरी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे उपस्थित होते.
अधिवक्ता राजेंद्र पांडे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे बालसाधक संपूर्ण शहराचे आकर्षण ठरले. त्यामुळे आमच्या शोभायात्रेचीही शोभा वाढली होती. हिंदु जनजागृती समितीच्या युवतींनी दाखवलेली स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके यांचेसुद्धा विशेष आकर्षण ठरले.’’
अधिवक्ता प्रशांत देशपांडे म्हणाले, ‘‘परशुराम जयंती म्हटले की, केवळ ब्राह्मण समाजच संघटित होतो; परंतु या वेळी आम्ही सर्वच हिंदूंना यात सहभागी होण्याचे आवाहन केले. हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे. आमच्या आवाहनानुसार सर्व हिंदू यात सहभागी झाले. आम्हाला यात यश मिळाले. यापुढेही आपण सर्वांनी असेच एकत्रित कार्य करत राहू.’’
अधिवक्ता ब्रजेश तिवारी म्हणाले, ‘‘या उपक्रमातून सर्व संघटनांची जवळीक झाली. आपण सर्वजण असे सातत्याने भेटलो, तर सर्व संघटनांमध्ये कुटुंबभावना निर्माण होईल. कु. गिरिजा टवलारे हिच्याकडे पाहूनच सनातन संस्थेची शिकवण आणि संस्कार किती चांगले असतील ? हे लक्षात येते. हीच पिढी पुढे आपला देश चांगल्या पद्धतीने सांभाळेल.’’
क्षणचित्र – श्री. रमेश छांगानी यांच्या पत्नीचे मोठे शस्त्रकर्म झाल्याने सनातनचे साधक त्यांना भेटायला जाणार होते. तेव्हा श्री. छांगानी म्हणाले, ‘‘आता तुमचा ‘हिंदू एकता दिंडी’चा मोठा कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यानंतर आलात तरी चालेल. तुमची सेवा महत्त्वाची !’’
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या विदर्भ संपर्कप्रमुखांकडून सनातनच्या कार्याचे कौतुक !
‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’चे विदर्भ संपर्कप्रमुख श्री. रमेश छांगानी यांनीही सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनीच शोभायात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते.