जालना येथे ४ कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण !
मुलाचे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पलायन
जालना – शहरातील व्यावसायिक महावीर गादिया यांचा मुलगा स्वयम (वय १६ वर्षे) हा इयत्ता १० वीची परीक्षा देण्यासाठी सकाळी पोदार शाळेच्या परीक्षा केंद्रावर गेला असतांना अपहरणकर्त्यांनी त्याचे दुपारी अपहरण केले. (राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा ! -संपादक) स्वयम याला सोडवण्यासाठी अपहरणकर्त्यांनी ४ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली; पण अपहरणकर्त्यांच्या कह्यातून तो सुटला. १८ मे या दिवशी दुपारी ४.३० वाजता अंबड रस्त्यावरील शहापूरजवळून पोलिसांनी त्याला कह्यात घेतले.
स्वयम याची परीक्षा दुपारी १२.३० वाजता संपणार होती; पण तो घरी न आल्याने पालकांनी चालकाच्या भ्रमणभाषवर दूरभाष केला. त्या वेळी अज्ञात अपहरणकर्त्यांनी ‘मुलगा हवा असल्यास ४ कोटी रुपये आणून द्या’, अशी धमकी दिली. या वेळी पोलिसांनी जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करून चालकाचा भ्रमणभाष शोधला केला असता मुलगा अंबड रस्त्यावरील शहापूरजवळ चालकासह आढळून आला. अपहरणकर्त्यांनी स्वयम आणि चालक यांना चाकूचा धाक दाखवून गाडीत बसवले होते. हे दोघे अपहरणकर्त्यांच्या कह्यातून सुटून आले होते. सायंकाळी विलंबापर्यंत चालकाची चौकशी चालू होती. ‘घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने चालकाकडून माहिती घेतली जात आहे. लवकरच आरोपी आणि घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा करणार आहोत’, अशी माहिती पोलिसांनी दिली.