भक्तांचा उद्धार आणि धर्मसंस्थापना यांसाठी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती करणारे अन् भगवंताचे सगुण रूप असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
ब्रह्मांडनायकाचे सगुण रूप असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक प्रेम हे आम्हा साधकजिवांचे इहलोकीचे आणि परलोकीचे वैभव आहे. या दृष्टीने साधकांसाठी सर्वस्व असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी कृतज्ञतापुष्प रूपाने सौ. शालिनी मराठे यांनी लिहिलेल्या लेखाचा पहिला भाग आपण १९ मे या दिवशी पाहिला. आज या लेखाचा पुढील भाग पाहूया.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/581108.html
४. गुरुकृपायोगानुसार साधना !
४ अ. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितके साधनामार्ग’, असे सांगून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व साधक जिवांना त्यांच्या प्रकृतीनुरूप योग्य साधनामार्ग सांगितला.
४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जिज्ञासूंना कर्मकांडातून उपासनाकांडात नेणे : पूजा, स्तोत्रपठण, उपवास अशा अनेक गोष्टींत अडकलेल्या जिवांना परात्पर गुरु डॉक्टरांनी कुलदेवतेचा नामजप सांगून एका नामजपावर आणले. स्थुलाला स्थळ-काळाचे बंधन असते; म्हणून त्यांनी जिवांना सूक्ष्मातून साधना करायला शिकवली. त्यांनी जिज्ञासूंना उपासना आणि मानसपूजा शिकवल्या. परात्पर गुरु डॉक्टरांनी जिवांना सूक्ष्मातून अमर्याद बळ दिले आणि त्यांचा अखंड नामजप चालू ठेवून त्यांच्या हृदयात चैतन्याचा नंदादीप अखंड तेवत ठेवला.
४ इ. जिवाला एका वर्णात अडकू न देता, चारही वर्णांची साधना करण्याचे महत्त्व पटवून देऊन साधनेच्या पुढच्या टप्प्यात नेणे : ईश्वरप्राप्तीसाठी, म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्यासाठी ईश्वराचे सर्व गुण आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी जिवावर चारही वर्णांनुसार (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र या चारही वर्णांनुसार) साधना करण्याचे महत्त्व बिंबवले आणि असे करून त्याला साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्यात नेले.
४ ई. ‘या जगतातील सर्वकाही ईश्वराचेच आहे’, हे लक्षात घेऊन त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी हळूहळू तन, मन, धन आणि बुद्धी हे सर्व त्यालाच अर्पण करण्याचे महत्त्व सांगून साधकांना त्याग करायला शिकवणे : परात्पर गुरु डॉक्टर सांगतात, ‘आपल्याला एकाच वर्गात शिकत न रहाता पुढच्या पुढच्या वर्गात जाऊन अध्यात्मातील महाविद्यालयीन पदवी प्राप्त करायची आहे. आपली आध्यात्मिक पातळी वाढवून आपल्याला शिष्योत्तम बनायचे आहे. यासाठी प्रथम शरीर (तन), नंतर मन, बुद्धी, धन, अहं आणि प्राण सर्वच ईश्वरचरणी अर्पण करायचे आहे. जे आहे, ते सर्व ईश्वराचेच आहे. ते सगळे त्यालाच अर्पण करून ईश्वराचे मन जिंकायचे आहे. त्याच्या इच्छेविना झाडाचे पानही हलत नाही. जिवाचे कल्याण व्हायला हवे, तर ईश्वराची संपूर्ण कृपा हवी ना !’ यातून भगवंताने (परात्पर गुरु डॉक्टरांनी) संपूर्ण गुरुकृपा होण्यासाठी शिष्याने टप्प्याटप्प्याने संपूर्ण त्याग करायचे महत्त्व शिकवले.
त्यांनी ‘ईश्वरच केवळ कर्ता आहे’, हे सूत्र मनावर ठसवून जिवाला अहंशून्य बनवले. त्यामुळे अन्य कोणत्याही योगापेक्षा गुरुकृपायोगात अहंचा लय जलद गतीने होऊ शकतो; म्हणून हा योग सर्व योगांचा मुकुटमणी आहे.
४ ई. मानवाच्या कुठल्याही स्थितीत, म्हणजे वयानुसार किंवा शारीरिक स्थितीनुसार साधना सांगणारा केवळ आणि केवळ गुरुकृपायोगच असणे अन् हेच त्याचे अद्वितीय वैशिष्ट्य असणे : देव जिवापाशी जे नाही, ते मागत नाही; पण जे आहे, त्याचा वापर किंवा त्याग करून व्यष्टी अन् समष्टी साधना करता येते. उतारवयात आपण स्वतःसाठी नामजप करून व्यष्टी साधना, तर समष्टीसाठी नामजप करून समष्टी साधना करू शकतो. वर्णाश्रमानुसार साधना करतांना व्यष्टीसाठी आनंदप्राप्ती आणि समष्टीसाठी पितृशाही किंवा हिंदु राष्ट्र हे ध्येय देणारा केवळ अन् केवळ गुरुकृपायोगच आहे. हेच त्याचे अद्वितीयत्व आहे.
कलियुगातील तमोगुण जेवढा प्रबळ आणि असाध्य आहे, तेवढीच त्यावरील उपाययोजनाही जाज्वल्य अन् परिणामकारक आहे. आपल्या लीलेने जगताचे रक्षण करण्यासाठी अवतरलेल्या त्या भगवान विष्णूचे (परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे) ते अवतारी कार्य आहे.’
५. समाजाकडून ईश्वराच्या तारक आणि मारक अशा दोन्ही रूपांची, म्हणजे परिपूर्ण साधना करून घेणारा ‘गुरुकृपायोग’ !
५ अ. गुरुकृपायोगानुसार तारक (अष्टांग) साधना : –
१. स्वभावदोष-निर्मूलन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भक्तीभाव जागृत करण्यासाठी करायचे प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम) किंवा साक्षीभाव.
५ आ. ईश्वराच्या मारक रूपाची साधना
५ आ १. समाजातील असात्त्विक जीव समाजाची सात्त्विकता न्यून करत असल्याने ईश्वराच्या मारक रूपाची साधना करणे अनिवार्य असणे : ‘काही विद्यार्थी अभ्यासू असतात, तर काही अभ्यास न आवडणारे असतात. काही उनाड विद्यार्थी अभ्यासू विद्यार्थ्यांना त्रास देतात. त्याप्रमाणेच ब्रह्मांडात काही जीव ईश्वरभक्त म्हणजे सत्त्वगुणी असतात, तर काही ईश्वराची विरोधीभक्ती करणारे, म्हणजे ईश्वराला शत्रू मानणारे तमोगुणी असतात. ते सत्त्वाचा ऱ्हास करतात. पुष्कळ परिश्रम घेऊन वाढवलेले शेत जनावरे काही घंट्यांत खातात किंवा उद्ध्वस्त करतात. त्यामुळे शेत लावण्याच्या समवेत ते राखणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यासाठी कलियुगात देवाच्या तारक रूपाच्या समवेत त्याच्या मारक रूपाची साधना अनिवार्य ठरते. त्यासाठी प्रत्येक साधकाला त्याच्यातील क्षात्रतेज जागवून सूक्ष्मातून लढावे लागते.
५ आ २. व्यष्टी स्तरावर स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करत साधना करणे अन् समष्टीसाठी प्रसंगी धर्मविरोधकांशी संघर्ष करून त्यांचा धर्मविरोध न्यून करणे : गुरुकृपायोगानुसार साधना करतांना व्यष्टी स्तरावर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे साधना व्यय होणे टळते. समष्टी स्तरावर धर्मांध, नास्तिक, निधर्मी, पाखंडी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी अशा प्रकारच्या सर्व धर्मविरोधकांशी धर्मनिष्ठांना संघर्ष करावा लागतो. सर्व समाज सात्त्विक होणे आणि ‘धर्मनिष्ठ अन् सात्त्विक प्रजापालक राजा मिळणे’ यांसाठी, म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’साठी हा संघर्ष अटळ आहे.
५ इ. साधक आणि समाज यांना ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज प्रदान करून धर्मसंस्थापना करणारा अपूर्व आणि दिव्य असा ‘गुरुकृपायोग’ ! : ‘सर्व हिंदूंनी (साधकांनी) संघटित होऊन हा संघर्ष करायचा आहे’, याची जाणीव करून देणारा, समाजाकडून ईश्वराच्या तारक आणि मारक अशा दोन्ही रूपांची, म्हणजे परिपूर्ण साधना करून घेणारा, समाजाला ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज प्रदान करणारा, पृथ्वीवरील सर्व साधकांना धर्मप्रसाराची सेवा उपलब्ध करून देणारा, प्रत्येक जिवामध्ये आत्मज्योत प्रदीप्त करून तमोगुणी कलियुगाला कोटीसूर्य समप्रभ, म्हणजे धर्मयुग बनवणारा ‘गुरुकृपायोग’ निर्माण करून परात्पर गुरु डॉक्टर या पृथ्वीवर धर्मसंस्थापना आणि सर्व जिवांचा उद्धार करत आहेत.
– गुरुचरणी शरणागत,
सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२१)
(क्रमशः)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/581629.html