ऑस्ट्रिया येथील सौ. लवनिता डूर् यांना पू. (सौ.) भावना शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
‘वर्ष २०१३ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मी पहिल्यांदा पू. भावनाताईंना भेटले. त्या वेळी मी १७ वर्षांची होते आणि साधनेला आरंभ करून मला एकच वर्ष झाले होते. देवाच्या कृपेने मला पू. भावनाताईंच्या समवेत २ – ३ आठवडे एकाच खोलीत रहाण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला त्यांच्यातील अनेक गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.
१. नीटनेटकेपणा
पू. ताई स्वतःचे कपडे खणात अगदी व्यवस्थित घड्या घालून ठेवत असत. त्यांनी घडी केलेल्या प्रत्येक कपड्याची घडी एकसारखी असल्यामुळे कपडे नीटनेटके दिसायचे. त्या मला साडी, ‘ब्लाऊज’ आणि पंजाबी पोशाख यांच्या घड्या कशा घालायच्या ?’, हे शिकवत असत. ‘मला कपड्यांच्या घड्या योग्य प्रकारे कशा घालायच्या, हे समजले आहे ना ?’, याची त्या निश्चिती करून घेत असत. मला जोपर्यंत योग्य पद्धतीने कपड्यांच्या घड्या घालायला जमत नव्हते, तोपर्यंत त्या मला समजावून सांगत असत. तेव्हापासून मी पू. ताईंनी सांगितलेल्या पद्धतीनेच कपड्यांच्या घड्या घालते.
२. दैनंदिन कृती भावपूर्ण करणे
पू. ताईंचे केस लांब आहेत. एकदा त्या केस विंचरत असतांना मी त्यांना विचारले, ‘‘केस व्यवस्थित कसे विंचरायचे ?’’ त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘सद्गुरु अनुताईंनी (सनातनच्या सद्गुरु (सुश्री (कु.) अनुराधा वाडेकर) एकदा मला सांगितले होते की, ‘स्वतःचे केस विंचरतांना ते देवीचे आहेत’, असा भाव ठेवून विंचरायचे.’’ त्यामुळे प्रतिदिन केस विंचरतांना त्या हाच भाव ठेवतात. त्या मला म्हणाल्या, ‘‘केस विंचरतांना हळूवारपणे आणि केसांमध्ये देवाचे अस्तित्व आहे’, या भावाने विंचरायला हवेत.’’ तेव्हापासून पू. ताईंनी दाखवल्याप्रमाणे मी माझे केस भावपूर्ण विंचरण्याचा प्रयत्न करते.
३. वात्सल्यमूर्ती
मला अनिष्ट शक्तींचा त्रास असल्याने रात्री बऱ्याचदा झोप येत नसे किंवा रात्री भयानक स्वप्ने पडत असत. त्या वेळी पू. ताई माझ्याजवळ बसून हनुमानचालिसा म्हणत असत. मला ते आवडले आहे, असे त्यांच्या लक्षात येताच त्या मला ‘‘मी पुन्हा म्हणू का ?’’ असे विचारून त्या हळुवारपणे माझ्या डोक्यावरून हात फिरवत. त्या माझी इतकी काळजी घेत की, ‘त्या माझी आईच आहेत’, असे मला वाटून मी त्यांचे निरपेक्ष प्रेम अनुभवत असे.
४. सेवेची तळमळ
काही वेळा पू. ताई रात्री उशिरा खोलीत येत असत. दुसऱ्या दिवशी मी त्यांना ‘‘तुमची पुरेशी झोप झाली का ?’’, असे विचारल्यावर त्या म्हणत, ‘‘सेवेतून मला पुष्कळ आनंद मिळाल्याने मी रात्री उशिरापर्यंत सेवा करत होते. ‘मला अखंड सेवारत रहावे’, असे वाटते.’’ त्या कालावधीत पू. ताईंनाही अधिक घंटे नामजपादी उपाय होते. त्यामुळे त्या दिवसा उपाय करत आणि रात्री जागून सेवा करत.
५. प्रेमाने साहाय्य करणे
झोपेत वाईट शक्तींचा त्रास होऊ नये, यासाठी त्या मला झोपण्यापूर्वी विविध उपाय उदा. नामजप ऐकत झोपणे, स्वतःच्या चारही बाजूंनी रिकामे खोके लावणे, कापराचे उपाय करणे इत्यादींची आठवण करून देत असत. झोपेत आपल्याला वाईट शक्तींचा त्रास होऊ नये, यासाठी ‘झोपतांना कोणता पोशाख परिधान करावा ?’, हेही त्या मला सांगत. संपूर्ण शरीर झाकले जाऊन त्रासदायक शक्तींपासून आपले रक्षण व्हावे, यासाठी त्या स्वतःही झोपतांना लांब बाह्यांचा पोशाख घालत असत. लांब बाह्या असलेला पोशाख घालण्याचे लाभही त्या मला सांगत.
६. संत करत असलेल्या नामजपादी आध्यात्मिक उपायांप्रती भाव असणे
पू. ताई रात्री उशिरा झोपत असत, तसेच त्यांना आध्यात्मिक त्रासही होत असे. त्यामुळे त्यांना सकाळी उशिरा जाग येत असे. सकाळी संतांचे नामजपादी आध्यात्मिक उपाय असत. या उपायांची वेळ त्या अगदी काटेकोरपणे पाळत असत आणि ‘उपायांचा एकही क्षण वाया जाऊ नये’, याची त्या काळजी घेत असत. या प्रसंगातून मला त्यांच्यातील नामजपादी आध्यात्मिक उपायांप्रती असलेला भाव शिकायला मिळाला.
७. शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्याची तळमळ आणि निश्चय असणे
गुरुपौर्णिमेच्या काळात ६० टक्के, संत आणि सद्गुरुपद प्राप्त केलेल्यांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात येते. पू. ताईंना तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने त्या वर्षी त्यांची पातळी वाढली नाही, म्हणजे त्यांची पातळी ६७ टक्के होती, ती तेवढीच राहिली. (वर्ष २०१३ मध्ये आध्यात्मिक त्रासामुळे पू. ताईंची पातळी तेवढीच राहिली होती.) त्या वेळी मी त्यांना ‘‘तुम्हाला काय वाटत आहे ?’’, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मला अजून बरीच प्रगती करायची आहे. मला संतपद (७० टक्के पातळी) प्राप्त करून १०० टक्के स्तर गाठायचा आहे.’’ त्यांना ‘संतपद प्राप्त केल्यावर काय जाणवते ?’, हे अनुभवण्याची पुष्कळ तळमळ होती. यावरून त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्याची तळमळ आणि निश्चय लक्षात येतो.
८. आध्यात्मिक त्रासामुळे आश्रमातील अन्न ग्रहण करण्यास साधिकेला त्रास होत असतांना ‘श्रीकृष्णाला भोजन देत आहे’, असा भाव ठेवून अन्न ग्रहण करण्यास सांगणे
आध्यात्मिक त्रास असल्याने मला आश्रमातील अन्न ग्रहण करता येत नसे. अन्न ग्रहण करायला आरंभ केल्यावर मला अनिष्ट शक्ती त्रास देत असत. त्या वेळी पू. ताई मला साहाय्य करण्यास येत. त्या मला ‘भाताच्या प्रत्येक शितामध्ये श्रीकृष्ण आहे, शरिरात वास करणाऱ्या श्रीकृष्णाला मी भोजन देत आहे आणि आश्रमातील भोजन करण्यास श्रीकृष्ण आतुर आहे’, असा भाव ठेवून अन्न ग्रहण करायला सांगत असत. असा भाव ठेवल्यावर माझा त्रास न्यून होत असे आणि मी आश्रमातील अन्न ग्रहण करू शकत असे.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणे
अ. पू. भावनाताईंना आणि मला पूर्वी एकदा परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग मिळाला. परात्पर गुरुदेवांच्या सत्संगला जाण्यापूर्वी ‘योग्य पोशाख कसा हवा ?’, तसेच ‘भाव कसा ठेवायचा ?’, याविषयी पू. ताईंनी मला मार्गदर्शन केले. पावलोपावली पू. ताई मला साहाय्य करत आणि मला प्रोत्साहन देत असत. भेटीच्या वेळी त्या परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाल्या, ‘‘मी लवनिताची आई आहे’, असे मला वाटते.’’ ते ऐकून परात्पर गुरु डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘असे वाटणे, हे प्रगतीचे लक्षण आहे.’’
देवाच्या कृपेने मला पू. भावनाताईंचा सहवास लाभला. आजही त्या प्रसंगांच्या आठवणीने माझे मन कृतज्ञतेने आणि आनंदाने भरून येते. संतांचे वेगळेपण हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. मला पू. भावनाताईंना आणि त्यांच्यातील गुणांना अधिक जवळून अनुभवता आले, यासाठी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पू. ताईंनी इतकी वर्षे कठोर साधना करून संतपद प्राप्त केले आहे आणि आध्यात्मिक प्रगतीचे शिखर गाठले, हे पाहून मला साधना करण्यासाठी प्रेरणा मिळाली. स्वतःमधील गुण आणि कौशल्ये इतरांना शिकवण्याचे महत्त्व पू. ताईंनी स्वतःच्या उदाहरणांतून दाखवून दिले. त्या केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता इतरांकडून पुढील टप्प्याचे प्रयत्न प्रेमाने करून घेतात. त्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि पू. (सौ.) भावना शिंदे यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. लवनिता डूर् (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), ऑस्ट्रिया (९.६.२०२१)
|