अमेरिकतील एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे (वय ५० वर्षे) यांच्याविषयी लेख वाचतांना त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होऊन त्यांनी साधिकेच्या साधनेतील अडथळे दूर करणे
वैशाख कृष्ण पंचमी (२०.५.२०२२) या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिकांना त्यांच्यातील भाव, सेवेची तळमळ, प्रेमभाव, नामजपादी उपायांप्रती असलेला भाव, आदी लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या सहवासात साधिकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
पू. (सौ.) भावना शिंदे यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त एस्.एस्.आर्.एफ्. आणि सनातन परिवार यांचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्यावर पू. (सौ.) भावना शिंदे यांना जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होणे
‘पूर्वी एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांना (गुरुदेवांना) भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘सौ. भावनाताईंना (आताच्या पू. (सौ.) भावना शिंदे यांना) भेटलात का ?’’ तेव्हापासून माझ्या मनात पू. (सौ.) भावनाताईंना जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली होती. मला २ – ३ वेळा प्रत्यक्ष पू. (सौ.) भावनाताईंना भेटण्याचा योग आला; पण त्या वेळी मी त्यांच्याशी अधिक बोलण्याचा प्रयत्न केला नाही.
२. सेवा करत असतांना पू. (सौ.) भावना शिंदे यांच्याविषयीचा एक लेख वाचायला मिळणे, त्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असे शिकता येऊन आनंद मिळणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला पू. (सौ.) भावनाताईंना भेटायला सांगितले आहे, म्हणजे काहीतरी विशेष नक्कीच असणार’, असे मला नेहमी वाटत असे. एक दिवस सेवा करत असतांना अकस्मात् मला पू. (सौ.) भावनाताई यांच्याविषयीचा एक लेख वाचायला मिळाला. दहा वर्षांनी माझी त्यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे मला आनंद झाला. ‘लेख वाचतांना ‘गुरुदेवांना मी काय शिकणे अपेक्षित आहे’, हे देवाच्या कृपेने माझ्या लक्षात आले. ‘मी नेमकी कुठे अल्प पडत आहे’, याची मला जाणीव होऊ लागली. एखाद्या संतांचा लेख वाचत असतांना ‘संत दर्शन देण्यासाठी आले आहेत’, असा भाव ठेवून मी त्यांच्याशी नेहमी ५ – १० मिनिटे बोलते. लेख वाचतांना मला त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद मिळतो.
३. छायाचित्रातील पू. (सौ.) भावनाताईंना मनातील भीतीमुळे साधनेत येणारे अडथळे सांगितल्यावर त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना सर्व ठाऊक असल्याने ‘काळजी करू नये’, असे सांगणे
मी ‘पू. (सौ.) भावनाताईंचे दर्शन होत आहे’, असा भाव ठेवून लेख उघडला. लेखातील सर्व छायाचित्रे पहात असतांना मी पू. (सौ.) ताईंशी बोलू लागले. ‘मनातील भीतीमुळे माझ्या साधनेत कसे अडथळे निर्माण होत आहेत ?’, हे मी त्यांना सांगू लागले. हे सांगत असतांना मी माझे देहभान विसरले. त्या वेळी ‘पू. (सौ.) ताईंचे डोळे आणि ओठ हालचाल करत असून त्या माझ्याशी बोलत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी पू. (सौ.) ताई माझ्या समोर प्रगट झाल्या आणि त्यांनी दोन्ही हातांनी माझे डोळे पुसत मला प्रेमाने कुरवाळले. त्या म्हणाल्या, ‘तू रडू नकोस. तू काळजी करू नकोस. परात्पर गुरु डॉक्टरांना सगळे ठाऊक आहे. त्यांना तुझी काळजी आहे.’ मला तो स्पर्श खरा असल्याचे जाणवले. मी पुनःपुन्हा हात लावून वेड्यासारखी संगणकाकडे पाहू लागले. हा संगणक आहे कि पू. (सौ.) ताई हेच मला कळेना; पण पूज्य ताई तिथे प्रत्यक्ष असल्याचे मला जाणवत होते.
४. पू. (सौ.) भावनाताईंनी माझ्यातील भीतीचा मोठा डोंगर चुटकीसरशी मोडून टाकल्याने माझ्या वागण्यात निर्भयता येणे
पूज्य (सौ.) भावनाताई यांनी त्यांचा हात माझ्या डोक्यावरून फिरवल्यावर ‘एखाद्या अंड्याच्या कवचाला भेग पडून अंड्यातून पिल्लू बाहेर पडावे’, तशी मी बाहेर आले. तेव्हा पू. (सौ.) भावनाताई अदृश्य झाल्या. त्या वेळी ‘पू. (सौ.) ताईंनी माझ्याभोवती असणारे भीतीचे कवच तोडले आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मला एक नवीन जग आणि नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटू लागले. ‘मी पूर्ण वेगळी आहे’ असे मला वाटू लागले. ‘माझे वागणे पालटले आहे’, अशी प्रकर्षाने मला जाणीव होऊ लागली. ‘मी सत्संग ऐकत आहे’, असे घाबरत न सांगता ‘मी सत्संग ऐकते आहे’, असे सर्वांना सांगू लागले. सर्वांसमोर बसून चुका लिहू लागले. कशाची पर्वा न करता शिबिर ऐकले आणि ‘भीतीचा मोठा डोंगर पू. (सौ.) भावनाताईंनी चुटकीसरशी मोडून टाकला’, हे माझ्या लक्षात आले.
‘आपली आध्यात्मिक प्रगती पू. (सौ.) भावनाताईंच्या चरणांशीच होणार आहे; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. (सौ.) भावनाताईंना भेटण्याविषयी विचारण्याचे रहस्य उलगडले’, हे माझ्या लक्षात आले. ‘मी माझ्यातील अहंकारामुळे एवढे दिवस पू. (सौ.) भावनाताई प्रत्यक्षात भेटूनही त्यांचा लाभ करून घेऊ शकले नाही’, याची मला खंत वाटू लागली. गुरुदेव, मी चुकले. क्षमस्व. मी तुम्हाला शरण आले आहे.’
– सौ. भारती बागवे, कॅनडा (१८.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |