काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू यांना ३४ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात १ वर्षाचा सश्रम कारावास

काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू

नवी देहली – काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने वाहन अपघाताच्या वेळी एका व्यक्तीला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. १५ मे २०१८ मध्ये याच गुन्ह्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना केवळ १ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याला न्यायालयात पुन्हा आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने स्वतःचा पूर्वीचा निर्णय रहित करून १ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. वर्ष १९८८ मध्ये ही घटना घडली होती.

भा.दं.वि.चे कलम ३२३ अंतर्गत सिद्धू यांना शिक्षा

भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३ नुसार जो कुणी जाणूनबुजून (कलम ३३४ मध्ये प्रदान केलेल्या प्रकरणांखेरीज) स्वेच्छेने एखाद्याला दुखावतो, त्याला अधिकाधिक एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा आहे. अपराध्यास एक वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा १ सहस्र रुपयांपर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा दिली जाईल.

संपादकीय भूमिका

३४ वर्षांनी एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपीला शिक्षा होत असेल, तर ‘पीडित व्यक्तीला न्याय मिळाला’, असे म्हणता येईल का ?