ज्ञानवापीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २० मे ला सुनावणी
नवी देहली – ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाविषयी १८ मे या दिवशी सुनावणी होणार होती. त्या वेळी हिंदु पक्षाने सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितल्यावर न्यायालयाने यावर उद्या, २० मे या दिवशी दुपारी ३ वाजता सुनावणी निश्चित केली आहे. या वेळी सर्व पक्षांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी न्यायालयाला सांगितले, ‘आमचे सहकारी ज्येष्ठ अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची उद्या सुनावणी करावी.’ यासमवेत सर्वोच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालयातील सुनावणीलाही स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयातील या प्रकरणाची सुनावणी २० मेपर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल वाराणसी न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालाविषयी कोणताही खुलासा करण्यास न्यायालयाच्या आयुक्तांनी नकार दिला आहे. ‘न्यायालयाचा आढावा घेतल्यानंतरच याविषयी कोणताही खुलासा करता येईल’, असे न्यायालय आयुक्त विशाल सिंह यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्ट ने ज्ञानवापी मस्जिद मामले पर वाराणसी कोर्ट में सुनवाई पर कल तक लगाईं रोक, कल 3 बजे सुप्रीम कोर्ट में होगी सुनवाई। #ATVideo #India #UttarPradesh #Varanasi #GyanvapiMosqueSurvey pic.twitter.com/R9InF9W3Lt
— AajTak (@aajtak) May 19, 2022
१. ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीने सर्वेक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. व्यवस्थापनाने म्हटले आहे, ‘ज्ञानवापी मशीद परिसरात करण्यात आलेले सर्वेक्षण हे ‘प्रार्थनास्थळ कायदा १९९१’च्या (प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्टच्या) तरतुदींचे उल्लंघन करत आहे.’ दुसरीकडे हिंदु सेनेने या प्रकरणात हस्तक्षेप याचिका प्रविष्ट करून मशीद व्यवस्थापन समितीची याचिका फेटाळण्याची मागणी केली होती.
२. याविषयी न्यायालयाने सर्वेक्षणाच्या संदर्भात दिवाणी न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीला स्थगिती देण्यास नकार दिला होता. सर्वेक्षणाच्या वेळी सापडलेल्या शिवलिंगाचा परिसर संरक्षित करण्याचे निर्देश न्यायालयाने जिल्हाधिकार्यांना दिले होते.