वेंगुर्ला येथील पत्रकार सुरेश कौलगेकर यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार घोषित
वेंगुर्ला – महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांना पत्रकारितेतील सर्वोच्च असा वर्ष २०२२ चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार घोषित झाला आहे.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. दर्पणकार आचार्य जांभेकर यांच्या देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या जन्मगावी त्यांची १७६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी ही घोषणा केली. या पुरस्काराचे वितरण ६ जानेवारी या दिवशी दर्पणकार आचार्य जांभेकर यांच्या जन्मदिनी करण्यात येणार आहे.
कौलगेकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून क्रीडा, कला, शिक्षण, साहित्य, पर्यटन, कृषी या क्षेत्रांत पत्रकारिता करतांना अनेक दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या सर्वांगीण कार्याची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला. यापूर्वी कौलगेकर यांना विविध तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.