परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या भ्रूमध्यावर दैवी चिन्हे उमटण्यामागील अध्यात्मशास्त्र !

व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसे तिचे आध्यात्मिक विचार, मार्गदर्शन, आध्यात्मिक कार्य यांसह तिच्या देहावरही देवत्वाचे संकेत दिसू लागतात. सप्टेंबर २०१८ मध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कपाळावर ‘ॐ’काराप्रमाणे स्पष्ट आकार उमटल्याचे दिसून आले. १०.६.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात श्री त्रिपुरसुंदरी याग करण्यात आला. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या भ्रूमध्यावर पणतीप्रमाणे आकार दिसून आला. २६.१०.२०१५ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अन्य एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या भ्रूमध्यावरही त्रिशूळाप्रमाणे आकार स्पष्टतेने दिसून आला. सनातनच्या गुरुपरंपरेच्या भ्रूमध्यावर दिसलेल्या या शुभचिन्हांचे आध्यात्मिक विश्लेषण आज आपण जाणून घेणार आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कपाळाच्या मध्यावर उमटलेला ‘ॐ’ सारखा आकार गोलात मोठा करून दाखवला आहे.

१. तिन्ही गुरूंच्या भ्रूमध्यावर शुभचिन्ह उमटण्यामागील अध्यात्मशास्त्र

जेव्हा आध्यात्मिक गुरूंचे कार्य ज्ञानशक्तीच्या बळावर चालू असते, तेव्हा त्यांच्या सहस्रारचक्राकडे ईश्वरी ज्ञानाचा प्रवाह येतो आणि तो त्यांच्या आज्ञाचक्राच्या वाटे वायूमंडलात प्रक्षेपित होतो. त्यामुळे जेव्हा ज्ञानशक्तीचा प्रवाह आज्ञाचक्रातून समष्टीकडे जात असतो, तेव्हा या दैवी प्रक्रियेची प्रचीती देण्यासाठी ईश्वरेच्छेने आध्यात्मिक उन्नतांच्या कपाळावर विविध प्रकारची दैवी चिन्हे उमटतात. यातून आध्यात्मिक गुरूंचे माहात्म्य जगाला समजणे सोपे जाते. अशाच प्रकारे सनातनचे ३ गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या भ्रूमध्यावर उमटलेल्या दैवी चिन्हांतून त्यांच्या दैवी कार्याची ओळख आपल्याला होते.

आश्रमात झालेल्या श्री त्रिपुरसुंदरी यागाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कपाळावर पणतीप्रमाणे दिसून आलेला आकार गोलात मोठा करून दाखवला आहे.

२. शक्तीचा प्रकार, तिची सूक्ष्मता, तिची अधिपति देवता आणि तिच्याशी संबंधित कुंडलिनीचक्रे

३. तिन्ही गुरूंच्या कपाळावर उमटलेल्या शुभचिन्हांचा भावार्थ

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कपाळावर दिसून आलेला ‘त्रिशूळा’प्रमाणे आकार गोलात मोठा करून दाखवला आहे.

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कपाळाच्या मध्यावर ‘ॐ’ उमटलेला असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून निर्गुण-सगुण स्तरावरील ज्ञानशक्ती आणि धर्मशक्ती यांचे प्रक्षेपण झाल्यामुळे त्यांच्या कपाळाच्या मध्यावर निर्गुणवाचक अन् धर्मसूचक असणारे ‘ॐ’ हे शुभचिन्ह उमटले आहे. त्यामुळे स्थुलातून समाजामध्ये साधकांकडून ‘ज्ञानशक्ती अभियान’ राबण्यात आले. या अभियानाच्या अंतर्गत सनातनच्या ग्रंथांचे वितरण समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होऊन समाजामध्ये धर्म आणि अध्यात्म यांच्या ज्ञानाचा प्रसार झाला. त्यामुळे अनेक सात्त्विक जिवांनी धर्माचरण आणि साधना करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे एकूण समाजाची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य झाले.

३ आ. आश्रमात झालेल्या श्री त्रिपुरसुंदरी यागाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कपाळावर पणतीप्रमाणे आकार दिसून येणे : त्रिपुरसुंदरीदेवीमध्ये शक्ती आणि ज्ञान यांचा सुरेख संगम झालेला आहे. त्याचप्रमाणे ती धर्मसंस्थापनेचे कार्य करण्यासाठीही अत्यंत पूरक असून ती धर्मराज्य चालवण्यासाठी मार्गदर्शक आहे. जेव्हा सनातनच्या रामनाथी आश्रमात श्रीत्रिपुरसुंदरीदेवीचा याग झाला, तेव्हा देवीकडून तेजतत्त्वाच्या स्तरावर पुष्कळ प्रमाणात ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती यांचे प्रक्षेपण झाले. याचे प्रतीक म्हणून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या कपाळावर पणतीप्रमाणे आकार आला. या आकारातून तेजोमय क्रियाशक्तीचे प्रक्षेपण होऊन धर्म आणि अध्यात्म यांचे प्रसारकार्य करणाऱ्या समष्टी जिवांना श्रीत्रिपुरसुंदरीदेवीकडून प्रक्षेपित झालेले धर्मतेज मिळाले. त्यामुळे त्यांच्या समष्टी कार्याला गती लाभली.

४. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कपाळावर त्रिशुळाप्रमाणे आकार दिसणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये श्रीदुर्गादेवीची मारक क्रियाशक्ती कार्यरत होऊन ती भारतातील देवस्थाने, तीर्थक्षेत्रे आणि प्रसारातील साधक यांच्यावर होणारी समष्टी स्तरावरील आक्रमणे परतवण्यासाठी प्रक्षेपित झाली. त्यामुळे श्रीदुर्गादेवीच्या हातातील त्रिशुळाचे शुभचिन्ह त्यांच्या कपाळावर उमटले. या शुभचिन्हातून प्रक्षेपित झालेल्या श्रीदुर्गादेवीच्या मारक शक्तीमुळे सहस्रो साधकांचे अधर्मी शक्तींपासून रक्षण झाले.

कृतज्ञता

‘श्रीगुरूंच्या कृपेने सनातनच्या तिन्ही गुरूंच्या कपाळावर उमटलेल्या दैवी चिन्हांचा भावार्थ उमजला आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र समजले’, यासाठी मी तिन्ही गुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (१३.६.२०२२)


तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

‘संतांच्या देहातील बुद्धीअगम्य पालटांविषयी संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भ्रूमध्यावर ‘ॐ’ दिसून येण्याचे काय कारण आहे ?

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या भ्रूमध्यावर पणतीप्रमाणे आकार दिसून येण्याचे काय कारण आहे ?

३. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या भ्रूमध्यावर त्रिशूळाप्रमाणे आकार दिसून काय कारण आहे ?

या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संपर्क : श्री. आशिष सावंत,

ई-मेल : mav.research2014@gmail.com

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.