नरसंहार कुणाचा ? फक्त काश्मिरी पंडितांचा कि समस्त हिंदूंचा ?
सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा अद्यापही चालू आहे. काश्मीरमधील हिंदूंच्या नरसंहारावर हा चित्रपट केलेला आहे. मी जाणीवपूर्वक ‘काश्मीरमधील हिंदू’ असा शब्दप्रयोग केला आहे. असा शब्दप्रयोग का केला ? त्याचे कारण समजून घ्यावे. आजवर काश्मीरमधील हिंदूंचा जो नरसंहार झाला होता, त्याला मुख्य धारेतील माध्यमांनी, सरकारी कार्यालयांनी, विविध व्यासपिठांनी आणि या नरसंहारावर जी काही पुस्तके लिहिली गेली, त्यामध्येही ‘काश्मिरी हिंदू पंडित’ असा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे. प्रश्न असा आहे की, काश्मीरमध्ये केवळ पंडित म्हणजे ब्राह्मणच रहात होते का ? जिहादी आतंकवाद्यांनी केवळ काश्मिरी ब्राह्मणांचीच हत्या केली होती का ? तसे मुळीच नाही. आतंकवाद्यांनी सरसकट सर्वच हिंदूंच्या हत्या केल्या आहेत आणि आजही ते करत आहेत; कारण त्यांच्यासाठी सर्वच हिंदू ‘काफिर’ होते आणि काफिरांविरुद्धच त्यांचा जिहाद चालू आहे. मग ‘काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला’, असे म्हणण्याऐवजी ‘काश्मिरी पंडितांचा नरसंहार झाला’, असेच का सतत म्हटले गेले ? खोलवर विचार करता यात फार मोठे षड्यंत्र दिसून येते.
१. काँग्रेसी आणि साम्यवादी प्रसारमाध्यमे यांनी ‘काश्मिरी हिंदूंऐवजी पंडितांच्या (ब्राह्मणांच्या) हत्या झाल्या’, असे दाखवून हिंदूंमध्ये फूट पाडणे
स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात ब्राह्मणांविरुद्ध अन्य हिंदु जातींना भडकावण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वीपासून ब्राह्मणांनी बहुजन समाज आणि दलित यांच्यावर कसे अत्याचार केले, याचा पाढा प्रतिदिन वाचला जात आहे. नव्हे कित्येक लोकांचे राजकारणच ब्राह्मणविरोधी अजेंड्यावर चालत असते आणि स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून हे राजकारण चालत आलेले आहे. हे राजकारण पुष्कळ अंशी यशस्वीही झाले आहे. पुष्कळसे हिंदू या राजकारणाचे बळी पडून घोर ब्राह्मणविरोधी झाले आहेत. निवळ ब्राह्मणविरोधीच नाही, तर हिंदु धर्मविरोधीही झाले आहेत.
काँग्रेसी आणि साम्यवादी प्रसारमाध्यमांनी सातत्याने ‘काश्मिरी हिंदूंऐवजी ‘काश्मिरी पंडित’ असा शब्दप्रयोग करून अन्य हिंदू कसे ब्राह्मणांपेक्षा वेगळे आहेत आणि म्हणून ते कसे सुरक्षित आहेत, असा एक मनोवैज्ञानिक प्रभाव ब्राह्मणेतर हिंदूंमध्ये निर्माण केला. त्याचमुळे भारतभरातील हिंदू काश्मीरमधील हिंदूंच्या या मोठ्या हत्याकांडप्रकरणी अलिप्त राहिला. त्यालाही असेच वाटत राहिले की, ही फक्त काश्मिरी ब्राह्मणांची समस्या आहे, समस्त हिंदूंची नाही. नव्हे तेच काँग्रेसी आणि साम्यवादी प्रसारमाध्यमांना हवे होते आणि तसेच झाले. आपल्या या षड्यंत्रात ते यशस्वी झाले. त्या वेळेस हिंदूंचा आवाज उठवणारे माध्यम एवढे सशक्त नव्हते आणि छद्म धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्यांना तितकासा लोकाश्रयही प्राप्त नव्हता.
२. ‘काश्मीरमध्ये झालेला नरसंहार हिंदूंचा होता, निवळ काश्मिरी पंडितांचा नाही’, हे ठळकपणे सांगणे आवश्यक असणे
कालांतराने राममंदिर आंदोलनामुळे भारतातील हिंदू जागृत आणि एकजूट होऊ लागला. हिंदूंचा आवाज असणारी माध्यमेही सशक्त होऊ लागली. कालांतराने हिंदुत्व जोपासणारे सरकारही सत्तेवर आले; पण तरीही ‘काश्मीरमधील हिंदू’ असा शब्दप्रयोग करण्याऐवजी ‘काश्मिरी पंडित’ असाच शब्दप्रयोग करणे थांबले नाही; कारण आतापर्यंत ते लोकांच्या अंगवळणी पडले होते; पण आज ‘द कश्मीर फाइल्स’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तरी काश्मीरमध्ये जो नरसंहार झाला, तो निवळ काश्मिरी पंडितांचा नव्हे, तर समस्त काश्मिरी हिंदूंचा झाला आहे, हे लोकांपर्यंत पोचणे अत्यावश्यक आहे. केवळ ‘हा नरसंहार फक्त काश्मिरी पंडितांचा झाला’, असे समजून बहुसंख्य हिंदू परत ‘ही समस्या आपली नव्हती आणि नाही’, असे समजून झोपी जातील. तसे होऊ नये म्हणून प्रत्येक व्यासपिठावर, समाजमाध्यमांवर, जनतेशी संवाद करतांना आणि जिथे जमेल तिथे, ‘हा नरसंहार हिंदूंचा झाला होता, निवळ काश्मिरी पंडितांचा नाही’, हे ठळकपणे मांडणे अत्यावश्यक आहे. तेव्हाच या जिहादी आतंकवादाचा मुकाबला करण्यासाठी समस्त हिंदूंची एकजूट होऊ शकेल. काँग्रेसी, साम्यवादी आणि तथाकथित सर्व सेक्युलर (निधर्मी) हिंदूंनीही आधी स्वतःच्या दिव्याच्या खालचा अंधार बघावा आणि मग हिंदु-मुसलमान दरी कुणी निर्माण केली ? त्यावर बोलावे.
– श्री. अतुल सोमेश्वर कावळे, नागपूर