पोर्तुगीज भाषा न येणाऱ्यांशी कठोरतेने वागणे
हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…
गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी एक डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. १८ मे या दिवशी आपण ‘स्थानिक भाषेच्या वापराला गुन्हा ठरवणारे आणि पोर्तुगीज भाषेत धर्मशिक्षण देणारे पाद्रीे’, याविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.
२२. पोर्तुगीज आणि भारतीय पाद्री यांत भेद करणारे आर्चबिशप
‘२१ नोव्हेंबर १७४५ च्या धर्मादेशाद्वारे गोव्यातील पाद्रींवर त्यांच्या नियुक्तीकरता खालील अटी घालण्यात आल्या. त्यामागे युरोपियन पाद्रींना मिळत असलेला लाभ स्थानिक पाद्रींना मिळू नये, हाच उद्देश होता. ‘पोर्तुगीज भाषेचे ज्ञान आणि फक्त तीच भाषा बोलण्याची क्षमता, केवळ स्वतःच नव्हे, तर त्यांचे नातेवाईक आणि स्त्रिया – पुरुषसुद्धा – आदरणीय पाद्रीने कडक परीक्षेनंतर काळजीपूर्वक विचार करून ठरवावी.’ – आर्चबिशप डॉम फादर लॉरेन्स द् सांता मारीय’ (पृष्ठ क्र. ४६)
२३. पोर्तुगीज न येणाऱ्यांवर विवाहबंदी
‘आर्चबिशप डॉम फादर लॉरेन्स द् सांता मारीय याने आणखी एक आदेश काढला. तो पाहिल्यावर या माणसाचे डोके ठिकाणावर होते ना ,अशी शंका येते. तो आदेश असा – ‘आम्हाला हा आदेश गोव्याच्या बेटांत, तसेच बार्देश आणि सासष्टी या प्रदेशांत पुन्हा लागू करतांना आनंद होतो. त्याद्वारे पोर्तुगीज भाषा न जाणणाऱ्या किंवा ती बोलण्याची सवय नसणाऱ्या कुठल्याही स्त्री-पुरुषास वैवाहिक करार करण्यास सक्त मनाई आहे. हा कायदा सर्व रहिवाशांना आणि सर्व ब्राह्मणांना अन् क्षत्रियांना हे प्रसिद्ध झाल्यावर सहा महिन्यांच्या आत लागू होईल. तेवढ्या अवधीत त्यांनी या भाषेतून बोलण्यास शिकावे. इतर जातींकरता ही मुदत एक वर्षाची राहील. मा. पाद्रींनी विशेष खबरदारी घ्यावी आणि सदर व्यक्तीला पोर्तुगीज कळते का अन् तिला पोर्तुगीज बोलण्याचा सराव आहे का ? याची परीक्षा करावी. ख्रिश्चन धर्माच्या तत्त्वांची परीक्षा घेतांना सर्व प्रश्न पोर्तुगीजमधूनच विचारावे आणि ही परीक्षा दुसऱ्या कुणी न घेता फक्त ‘व्हायकर्स्’नी किंवा त्यांच्या क्युरेटनी घ्यावी आणि ‘होली गॉस्पेल’च्या साक्षीनेच त्यांना प्रमाणपत्र द्यावे.’
अशा तऱ्हेने सर्व सक्तीचे उपाय योजले. अगदी १८३१ मध्ये व्हाईसरॉय डॉम मानुयेल द् पोर्तुगाल काशत्रोने शाळेत, सार्वजनिक कार्यालयात तसेच बरोकीमध्ये आमची भाषा बोलण्यास सक्त मनाई केली.’ – (पृष्ठ क्र. ४६-४७)
२४. सक्तीच्या पोर्तुगीज भाषेमुळे निरक्षरतेचे प्रमाण ८३ टवके
‘या विचित्र धोरणाचा निवळ परिणाम म्हणजे आमची दारूण निरक्षरता, ज्यात आमचे लोक आकंठ बुडाले आहेत ते खेदजनक अज्ञान आणि एकही कोकणी शाळा नसणे, हा होय. चारशे वर्षांच्या या उच्चाटनाच्या तिरस्करणीय उपायानंतर पोर्तुगीज हिंदुस्थानात ८३.७ टक्के ही निरक्षरांची अद्भुत टक्केवारी आहे आणि पोर्तुगीज भाषेच्या प्रसारासाठी एवढे रानटी उपाय योजूनसुद्धा अवघे ७.६ टक्के लोक पोर्तुगीज लिहू-वाचू शकतात, तर ८.७ टक्के लोक पोर्तुगीज सोडून दुसरी भाषा लिहू-वाचू शकतात. ही आकडेवारी मराठी शाळांमध्ये शिकलेल्यांची आहे.
पोर्तुगीज भाषेच्या सक्तीमुळे आमच्या लोकांत केवळ धक्कादायक निरक्षरता निर्माण झाली; कारण पोर्तुगीज भाषा आमच्या देशाला यथोचित नव्हती. आमच्या लोकांनी सहज शिकण्यासारखी नव्हती. आमच्या जीवनातील वैशिष्ट्ये, स्थानिक पदार्थ यांचे वर्णन करायलाही ती अपुरी पडते.’
– (पृष्ठ क्र. ४७-४८)
(लेखातील दिलेले पृष्ठ क्रमांक ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास’ या पुस्तकातील आहेत. इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)