कलाकारांनो, गोप-गोपींप्रमाणे ईश्वरप्राप्तीसाठी गायन आणि नृत्य करून या कलांद्वारे सर्वाेच्च आनंदाची अनुभूती घ्या !
‘द्वापरयुगामध्ये गोप-गोपी श्रीकृष्णाच्या निस्सीम भक्त होत्या. गोपींच्या भक्तीला ‘आदर्श भक्ती’ची उपमा दिली जाते. त्यांनी ‘श्रीकृष्ण हाच परमात्मा आहे’, हे अंतर्मनाने जाणून काया, वाचा आणि मन यांद्वारे श्रीकृष्णालाच भजले होते. अशा श्रीकृष्णाच्या परम भक्तांचे गायन, नर्तन हे स्वतःसाठी कसे असू शकेल ? गोप-गोपी त्यांच्या अंगभूत कलांचा उपयोगही श्रीकृष्णस्मरणात रहाणे किंवा त्याच्याशी अनुसंधान साधणे यांसाठी, म्हणजेच खऱ्या अर्थाने ईश्वरप्राप्तीसाठी करत होत्या. शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्या रात्री श्रीकृष्णाने राधा आणि गोपी यांसह केलेला रासोत्सव, हे याचे उदाहरण आहे. ‘हा रासोत्सव म्हणजे गायन, नृत्य या कला ईश्वरासाठीच आहेत’, याची प्रचीती देणारा होता. मोहमायेपासून विरक्त असलेल्या गोपी आणि भगवंत श्रीकृष्ण यांची रासलीला अत्यंत पवित्र होती. या भावनृत्याच्या माध्यमातून श्रीकृष्णाने गोपींना सर्वाेच्च आनंदाची अनुभूती दिली होती.
या तुलनेत आजकाल बहुतांश गायक, नर्तक आदी कलाकार स्वतःला सुख, मान, पैसा इत्यादी मिळावे, यांसाठी गायन आणि नृत्य या कलांचा उपयोग करतांना दिसतात. आजकाल बऱ्याचदा कलेची प्रस्तुती आत्मकेंद्रित आणि लोकेषणायुक्त असल्यामुळे कलाकारांचे आराध्य भगवंत नसून प्रेक्षकवर्ग झालेले आहे. सध्या अनेक कलाकार ‘लोकांना काय आवडेल ?’, याचा विचार करून त्यानुसार कलेची प्रस्तुती करतांना दिसतात. विविध कला ईश्वरी असूनही बऱ्याच कलाकारांची कला ईश्वराभिमुख न रहाता लोकाभिमुख झाली आहे. त्यामुळे त्यांतून कलाकाराला किंवा प्रेक्षकांना ईश्वरी अनुभूती येण्याचे प्रमाण अत्यल्प दिसून येते. यांतून कलाकाराला कोणताही आध्यात्मिक स्तरावर लाभ न होता लोकांनी दिलेल्या प्रतिसादाने कलाकाराचा अहंकार वाढणे, पैशाची लालसा निर्माण होणे, अशा स्वरूपात त्यांची अधोगतीच होतांना दिसत आहे.
‘कलाकारांनो, प्रत्येक कलेची निर्मिती ही भगवंतप्राप्तीसाठी झालेली आहे’, हे कलेचे मूळ उद्दिष्ट जाणून या कलांद्वारे गोप-गोपींप्रमाणे भगवंतप्राप्ती करूया !’
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (१९.१.२०२२)