श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !
१. साधना करतांना सारखे भावावस्थेत राहिलो, तर गुरु आपल्याला आयुष्यात काहीही अल्प पडू देत नाही.
२. आपल्या मनातील देवाच्या संदर्भातील विचार हेच आपले खरे सौंदर्य आहे.
३. साधनेत समष्टीमध्ये ईश्वरी कार्य करत समष्टीसाठी पुढे-पुढे जाणे, हाच खरा मोक्ष आहे.
४. सहवासापेक्षा श्रद्धाच कार्य करते. सहवास हा तात्कालिक आहे आणि श्रद्धा ही भाव-भक्ती वाढवणारी चिरंतन क्रिया आहे.
५. ‘गुरु प्रत्येक क्षणाला आपल्या समवेतच आहेत’, हे जो अनुभवतो, तो पुढे जातो आणि जो अनुभवू शकत नाही, तो मागे रहातो.
६. व्यवहारात लोकांना कार्य करण्यासाठी पदाची किंवा कोणाच्या तरी ओळखीची आवश्यकता लागते, तर साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते.
७. केवळ दिगंबर अवस्थेत राहून वैराग्य येत नाही, तर मनालाही तसे आतून घडवावे लागते.
८. कंटाळा येणे म्हणजे स्वतःतील देवत्व तेवढ्या काळापुरते संपुष्टात येणे. मन भावनेत गुंतले की, ‘कंटाळा येणे’ चालू होते. भावनेत मनुष्यस्वभाव गुंतलेला असतो, तर भावात देव असल्याने सर्व कार्य ईश्वरेच्छेने होते, यालाच ‘साधना’ म्हणतात.
९. देवाच्या दर्शनापेक्षा त्याच्या आर्त स्मरणामध्ये जास्त चांगले वाटते ! : याचे कारण दृश्यापेक्षा विचार जास्त सूक्ष्म असतात आणि दर्शन हे क्षणिक आहे.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |