अमेरिकेतील सौ. राजलक्ष्मी जेरे यांना स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपात झालेले दर्शन !
१. स्वप्नात दिसलेले दृश्य
१ अ. स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा निलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपात दिसणे : ‘१९.७.२०२० या दिवशी सकाळी उठल्यावर मला आदल्या रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण झाली आणि माझा भाव जागृत झाला. मला स्वप्नात दिसले होते, ‘मी श्री महालक्ष्मीदेवीच्या (बहुतेक मी कोल्हापूरला जात होते.) दर्शनासाठी निघाले होते. माझ्या समवेत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ होत्या. मी त्यांना नमस्कार केल्यावर त्या माझ्याकडे पाहून हसल्या. आम्ही दोघी एका ठिकाणी उतरलो आणि देवळात गेलो. देवळात गेल्यावर श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करतांना मला देवीच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिसल्या. त्यांच्या अंगावर श्री महालक्ष्मीदेवीने नेसलेली साडी आणि अलंकार होते. माझ्या शेजारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ उभ्या होत्या. ‘त्यांच्या ठिकाणीही मला श्री महालक्ष्मीदेवी दिसली. मला ‘त्यांच्या अंगावरही श्री महालक्ष्मीदेवीने नेसलेली साडी आहे’, असे दिसले.
१ आ. स्वप्न आठवून भाव जागृत होणे आणि त्या दोघींना मानस नमस्कार करणे : मला पडलेले स्वप्न आठवून माझा भाव जागृत होत होता. मला त्या दोघींविषयी कृतज्ञता वाटून ‘त्यांच्या चरणी शरण जावे’, असे वाटले. मी मनातून त्या दोघींच्या चरणी नमस्कार केला.
२. स्वप्न ‘गुरुपरंपरेचे सूचक आहे’, असे वाटणे
अ. मागील काही वर्षे मला पडलेल्या स्वप्नांचा मी विचार करत होते. आरंभी मला स्वप्नात प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होत होते. त्यानंतर मला स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होऊ लागले आणि आता स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन २ – ३ वेळा झाले.
आ. मला काही वेळा अजूनही स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होते; पण आता प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होत नाही. ‘यामागील कारण काय असावे ?’, याचा विचार करण्याचा प्रयत्न केल्यावर मनात विचार आला, ‘हे गुरुपरंपरेचे सूचक असेल.
(प्रश्न : हे योग्य आहे का ? असे का होत आहे ?)’
– सौ. राजलक्ष्मी जेरे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सॅन डिएगो, अमेरिका. (१२.८.२०२०)
उत्तर : ‘गुरुपरंपरेनुसार हे दर्शन होत आहे’, हे आपल्याला मनातून मिळालेले उत्तर योग्य आहे. सप्तर्षींच्या मार्गदर्शनानुसार परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचे ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना निवडले आहे. त्यामुळे देव आता तुम्हाला सध्याच्या गुरुपरंपरेचे दर्शन घडवत आहे. यात ‘गुरूंवरील श्रद्धा अधिकाधिक वृद्धींगत व्हावी’, हाच त्याचा उद्देश असतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (६.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |