पुणे येथील राष्ट्रवादी शहराध्यक्षांसह ४० जणांवर अदखलपात्र गुन्हे नोंद !

कार्यक्रमस्थळी आंदोलन करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते

पुणे – केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षांसह ४० जणांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात १७ मे या दिवशी अदखलपात्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, महेश हांडे, उदय महाले, मृणाल वाणी, अनिता पवार आदी ४० पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

खोटे गुन्हे मागे घ्या ! – भाजप

‘बालगंधर्व’ येथील कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. त्यांनी राजकारण खालच्या स्तरावर नेले आहे. उलट पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंद केले आहेत ते मागे घ्यावेत, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या शिष्टमंडळाने डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली.