भजन स्पर्धेच्या जोडीला धर्मशिक्षण द्या !
महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये शिक्षा भोगणाऱ्या बंदीवानांमधील कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार वाढीस लागावा; म्हणून कारागृहात जगद्गुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी येरवडा कारागृहातील बंदीवानांना प्रसिद्ध गायक रघुनाथ खंडाळकर प्रशिक्षण देत आहेत. सकारात्मक विचार वाढण्यासाठी संतांनी म्हटलेली चैतन्यदायी भजने आणि अभंग यांचा लाभ होतो, हे नक्की. किंबहुना चैतन्यदायी भजने आणि अभंगच मनुष्याला जीवन जगण्याची दिशा देतात. तरीही गुन्हेगारी वृत्ती नष्ट करण्यासाठी अजून कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करायला हवा, याचाही विचार व्हायला हवा.
व्यक्ती एका दिवसात गुन्हेगार होत नाही. गुन्हेगार बनण्यासाठी बाह्य परिस्थिती, जीवनात घडणारे प्रसंग, मुळात व्यक्तीचा स्वभाव, आळशीपणा किंवा अतीलोभापायी झटपट श्रीमंत बनण्याची हाव, अशी अनेक कारणे मनुष्याला गुन्हेगारी वृत्तीकडे घेऊन जातात. प्रत्येक गुन्हेगाराचा या दृष्टीने अभ्यास करणे कठीणही आहे. तरीही त्यांच्यामध्ये सकारात्मकता वाढावी म्हणून संतसाहित्याचा स्पर्धेच्या निमित्ताने घेतलेला आधार नक्कीच गुन्हेगारी वृत्ती अल्प करण्यासाठी उपयोगी पडेल. यासमवेत ज्याप्रमाणे वाल्या कोळ्याला नारदमुनींनी त्याला अंतर्मुख बनवत रामनामाचा जप करायला सांगितला. प्रारंभी त्याला ‘राम’ म्हणता येत नव्हते. तो ‘मरा’ म्हणत होता; परंतु कालांतराने त्याला ‘राम राम’ म्हणता आले. प्रभु श्रीरामचंद्रांचे नाव त्याने पुढे इतके भावपूर्ण घेतले की, तो स्वतःच राममय झाला आणि कालांतराने ते वाल्मीकिऋषि झाले.
व्यक्तीची गुन्हेगारी वृत्ती नष्ट करण्यासाठी त्याला धर्मशिक्षण दिले की, आपण स्वतः चांगले का वागायला हवे ? किंवा वाईट वागण्यामुळे होणारे दुष्परिणाम त्याच्या लक्षात येतात. त्याला धर्मशास्त्रानुसार उपासनेची जोड दिल्यास योग्य कृती करण्याचे बळ मिळते. धर्मशास्त्रानुसार हिंदूंनी कुलदेवतेची उपासना करणे आवश्यक आहे. यामुळे अंतर्मनातील अयोग्य संस्कार नष्ट होण्यास साहाय्य होते. त्यामुळे शासनाने भजने आणि अभंग स्पर्धांच्या जोडीला बंदीवानांना धर्मशिक्षण देण्याचे नियोजन करावे, तसेच देशातील गुन्हेगारी वृत्तीचा समूळ नायनाट होण्यासाठी सर्वांनाच धर्मशिक्षण देणे अन् कठोर शिक्षेची प्रभावी कार्यवाही करणे अपरिहार्य आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे