हिंदुत्वनिष्ठ आणि ब्राह्मण यांच्या विरोधातील षड्यंत्र जाणा अन् त्याला प्रभावी संयमाने सामोरे जा !

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक हिंदुत्ववनिष्ठ आणि विशेषत: ब्राह्मणांच्या विरोधात भलतेच आक्रमक झालेले आहेत. हे लोक सत्तेचा गैरवापर करत जाहीर सभेत काहीही बरळतात, ब्राह्मण आणि हिंदु यांच्याविरोधात गरळ ओकतात. त्यांना प्रत्युत्तर देणाऱ्यांना मात्र गुंडगिरी करून आणि येनकेन प्रकारेण कायद्याच्या कचाट्यात अडकवून त्यांची तोंडे बंद करण्याच्या प्रयत्न करतात. हे सर्व अचानक आणि उत्स्फूर्तपणे घडत नाही, तर ही एक मोठी योजना आहे, असे मला वाटते. कदाचित यात हिंदुत्वनिष्ठांना एखाद्या मोठ्या सापळ्यात अडकवण्याचे षड्यंत्रही असू शकते. हे सर्व करण्यामागची काही ठळक कारणेही येथे देत आहे.

१. सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या घटना राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असणे

सध्या महाराष्ट्रात घडणाऱ्या अनेक घटना पहाता सध्या राष्ट्रवादीचे नेते स्वतःला पोषक अशी परिस्थिती निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत कि काय ? अशी शंका निर्माण होत आहे. उदा. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे चिथावणीपूर्ण भाषण आणि नंतर त्यांचा माफी मागण्यासही नकार ! सध्या विरोधकांना गप्प बसवण्यासाठी असभ्यतेचा, गुंडगिरीचा आणि कायद्याच्या बडग्याचा गैरवापर करणे, तसेच महिलांनाही यात मुद्दामहून भरडून काढणे, विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यास क्षुल्लक कारणावरून मारहाण होणे. सगळ्यात ठळक गोष्ट म्हणजे नुकतीच ‘बारामतीचा गोडसे’ निर्माण होण्यासंदर्भातील फेसबूकवरील आक्षेपार्ह पोस्ट (लिखाण) फिरणे आणि या पोस्टचा कर्ता अन्य कुणी नाही, तर राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असल्याचे निष्पन्न होणे.

२. धर्माभिमानी हिंदू आणि ब्राह्मण वर्ग यांनी कोणत्याही विपरीत घटनेस कारणीभूत ठरू नये !

ही सर्व परिस्थिती पहाता कुणीतरी जाता जाता स्वतःची काळी कृत्ये कायमची विस्मरणात घालवून इतिहासात अमर आणि युगपुरुष होण्याचा प्रयत्न करत आहे, अशी शक्यता वाटत आहे. त्यामुळे धर्माभिमानी हिंदु बांधवांना आणि विशेषत: ब्राह्मण वर्गाला असे सांगावेसे वाटते की, राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याच्या सध्याच्या चिथावणीपूर्ण वक्तव्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्यांची वक्तव्ये केवळ तुम्हाला चिडवून काढण्यासाठी आणि अपकृत्य करण्यास उद्युक्त करण्यासाठीच आहेत, हे ध्यानात ठेवा. जर का तुम्ही चिडून त्यांच्या कुठल्या ज्येष्ठ नेत्यावर आक्रमण केलेच अथवा त्यांना असभ्य भाषेत प्रत्युत्तर दिले, तर ते कृत्य त्यांच्या विचारधारेला संजीवनी देणारे ठरू शकते. तसेच अशा कोणत्या तरी विपरीत घटनेमुळे राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची जनमानसात आज निर्माण झालेली भ्रष्ट आणि हिंदुविरोधी प्रतिमा क्षणात पालटून ती ‘युगपुरुष’ अशी निर्माण होऊ शकते, हेही लक्षात घ्या. तुम्ही दुरान्वयेही कोणत्या विपरीत घटनेस कारणीभूत ठरू नका. (यासाठी वर्ष १९४८ चा इतिहास लक्षात ठेवा आणि पुन्हा तशी चूक करू नका.)

३. श्रद्धास्थानांचा अवमान करणे, म्हणजे सूर्याकडे बघून थुंकल्यासारखे असणे

अभिनेत्री केतकी चितळे यांच्याप्रमाणे दायित्वशून्यरित्या वागणाऱ्या व्यक्तींचे अजिबात उदात्तीकरण करू नका. कुणी तुमच्या देवीदेवतांचा अथवा महापुरुषांचा अवमान केला; म्हणून त्यांचा अपमान होत नसतो, उलट अशाने तो अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाच मान अल्प होत असतो, हे लक्षात असू द्या. (असे असले, तरी हिंदूंनी त्यांच्या श्रद्धास्थानांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निवेदन देणे, निषेध करणे, अशा वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. – संपादक) दुसऱ्याच्या श्रद्धास्थांनाचा अवमान करणे, म्हणजे सूर्याकडे बघून थुंकल्यासारखे आहे.

४. सध्याच्या चिथावणीपूर्ण आणि हिंदुविरोधी वक्तव्यांवर संयम हाच एकमेव प्रभावी उपाय असणे

येणाऱ्या अडीच वर्षांच्या काळात अशी जातीय सलोखा बिघडवणारी, चीड आणणारी, चिथावणीपूर्ण आणि हिंदुविरोधी वक्तव्ये वारंवार होणार आहेत. एवढेच नव्हे, तर जशा निवडणुका जवळ येत जातील, तसे त्यांचे प्रमाण आणि त्यामधील विखार हा वाढतच जाणार आहे, हेही लक्षात असू द्या ! यावर तुमचा संयम हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. आज त्यांच्या विचारधारेस मानणाऱ्यांपेक्षा त्यांचा विरोध करणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. जनता सर्व बघत असते आणि योग्य वेळी मतपेटीतून उत्तरही देत असते. त्यामुळे ते जेवढा विखार वाढवतील, तेवढाच तुमचाही जनाधार आणि सहानुभूती वाढतच जाईल. सध्याच्या या विखारास कोल्हेकुई किंवा एक सापळा समजा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचे काम शांतपणे करत रहा. जशी मागची अडीच वर्षे गेली, तशी पुढचीही जातील, केवळ आपण स्वतःची कृती आणि वक्तव्य यांवर संयम बाळगणे आवश्यक आहे.

जय शिवराय, जय श्रीराम !

– दिनेश कांबळे यांच्या ‘फेसबूक’वरून साभार